जत्रेत चोरीच्या बहाण्याने लपून बसलेल्या दोघांना 7 दिवसांचा सश्रम कारावास

रत्नागिरी : शुक्रवारी कार्तिकी एकादशीनिमित्त जमलेल्या जत्रेत अंधारात चोरी करण्याच्या बहाण्याने लपून बसलेल्या दोन तरुणांना न्यायालयाने मंगळवारी 7 दिवस सश्रम कारावास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
कैलास राहुल खाडे (23) आणि अमोल विजय दगडे (19, रा दोन्ही पिंपरी-चिंचवड, पुणे) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त रत्नागिरीत दिवसभर जत्रेत गर्दी उसळते या गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या होऊ शकतात याचा विचार करून पोलीस जत्रेत लक्ष ठेवून होते. तेव्हा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जत्रेच्या वेळी यातील कैलास खाडे हा पटवर्धन हायस्कूलसमोरील बोळात आणि अमोल दगडे हा एसटी स्टँडसमोरील बेंजामिन एन्क्लेव येथे अंधारात आपली ओळख लपवून चोरी करण्याच्या इराद्याने बसले होते.
पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावल्याने दोघांनाही अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 (क ) नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते. मंगळवारी या दोघांनाही सह दिवाणी न्यायाधीश एम. आर. सातव यांनी 7 दिवस सश्रम कारावास आणि 500 रुपये दंड तो न भरल्यास 3 दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड प्रज्ञा तिवरेकर यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कांस्टेबल दुर्वास सावंत आणि प्रिया लिंगायत यांनी काम पाहिले.
Comments
Post a Comment