Indapur Crime : पेन्शनसाठी पोटच्या मुलाची आईला अमानुष मारहाण, इंदापूरमधील धक्कादायक प्रकार
![]()
Crime News : वैजयंता यांना मोठ्या मुलाने राहत्या घरी मारहाण केली तसेच शिवीगाळ, दमदाटी करुन डोक्यात लाकडाचा ओंडका फेकून मारल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. अशा आशयाची तक्रा वैजंयता जाधव यांनी दिली आहे.
पुणे : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलाने अमानुषपणे आईला मारहाण केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप जाधव असं मारहाण केलेल्या आरोपीचे नाव आहे. वैजंयता जाधव यांनी आपल्या मुलाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन इंदापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणात पेन्शन लाटण्यासाठी छळ केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैजयंता जाधव या इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील रहिवासी आहेत.
आईचं आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असते. स्वत:च्या सर्व आवडी-निवडी बाजूला ठेवून ती आपल्या मुलांसाठी राबत असते. मुले मोठी झाली की त्यांना आई नकोशी होते. वैजयंता यांना मोठ्या मुलाने राहत्या घरी मारहाण केली तसेच शिवीगाळ, दमदाटी करुन डोक्यात लाकडाचा ओंडका फेकून मारल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. अशा आशयाची तक्रा वैजंयता जाधव यांनी दिली आहे. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी घडली. २५ तारखेला वैजंयता यांना चक्कर येऊ लागल्याने त्यांच्या धाकट्या मुलाने त्यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांनी आज इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
इंदापूर पोलिसांनी आरोपी विरोधात भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. मुलाने आईला मारहाण का केली याची अधिकृत माहिती मिळाली नाहीये. परंतु आईला मिळणारी पेन्शन मुलाला पाहिजे होती त्यामुळे मुलाने आईला मारहाण केल्याची चर्चा आहे. परंतु याबद्दल अजून अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment