मराठवाड्यात पावसाचं रौद्ररूप: जालन्यातील काही गावांत ढगफुटीसदृष्य पाऊस; शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान
![]()
Jalna Farmer Updates : शेतकरी आता कुठे सावरत असताना पुन्हा अतिवृष्टीचे संकट ओढावले आहे. पिकावर इतका खर्च करून अंतिम टप्प्यात मुसळधार पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे.
जालना : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विविध जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सतत होत असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील काही गावांमध्येही गुरुवारी संध्याकाळी ढगफुटीसदृष्य पाऊस कोसळला. त्यामुळे ओढे-नाले ओसंडून वाहू लागले, तसंच शेतजमिनींमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. परिणामी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दोन वर्ष करोना महामारीच्या संकटातून शेतकरी आता कुठे सावरत असताना पुन्हा अतिवृष्टीचे संकट ओढावले आहे.
दिवाळी सण जवळ आल्याने बहुतांश शेतकरी शेतातील धान्य विकून त्यातून आलेल्या पैशांमधून दिवाळीसाठी खरेदी करत असतात. मात्र यावर्षी पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचा दिवाळी कडू होणार आहे. जाफराबाद तालुक्यात सद्यस्थितीत सोयाबीन आणि मका पीक काढणीची वेळ आहे. त्यात जोरदार पावसाने पिके पाण्याखाली जाऊन खराब होत आहेत. आता सोयाबीनची पिके हातातून गेल्यात जमा असून कापूस पिकाची सुद्धा तीच अवस्था काल रात्री झालेल्या पावसामुळे झाली आहे.
Comments
Post a Comment