आमदार भास्कर जाधव यांना कुडाळ पोलिसांकडून नोटीस

कुडाळ : भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल जनमानसात बदनामी, अब्रूनुकसानीकारक तसेच प्रक्षोभक व चिथावणी देणारी वक्तव्ये केल्याप्रकरणी माजी मंत्री तथा गुहागरचे आमदार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांना कुडाळ पोलीसांनी अटकेत संदर्भात नोटीस शनिवारी सायंकाळी उशिरा बजावली आहे.
कुडाळ येथे काढलेल्या महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या सभेत माजी मंत्री भास्कर जाधव यांच्यावर कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीम. आर. जी. नदाफ यांनी दिली आहे.
कुडाळ येथे झालेल्या सभेत माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर याबाबतची फिर्याद भाजपचे ओरोस मंडळ व तालुकाध्यक्ष तुकाराम साईल यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यानुसार, १८ ऑक्टोबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व महाविकास आघाडीचे घटक पक्ष यांनी आम. वैभव नाईक यांच्याविरुद्ध चुकीच्या पद्धतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू केल्याच्या कारणावरून एसीबी कार्यालयावर मोर्चा काढला होता. येथील महिला व बाल रुग्णालय येथे या मोर्चानंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत आम. श्री जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल बदनामीकारक तसेचप्रक्षोभक व चिथावणीखोर क्तव्ये केली होती असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. या फिर्यादीची दखल कुडाळ पोलिसांनी घेत श्री. जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी शनिवारी आ. जाधव यांच्या चिपळूण तालुक्यातील पाग येथील निवासस्थानी जाऊन अटकेसंदर्भातील ४१ (अ) (१) अन्वये नोटीस बजावली. तपासकामात सहकार्य करावे, नोटिसीतील नमूद अटीशर्तींचे काटेकोर पालन करावे, अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली, अशी माहिती कुडाळ प्रभारी पोलीस निरिक्षक नदाफ यांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी शिंदे व हवालदार सचिन गवस यांनी ही नोटीस बजावली..
Comments
Post a Comment