रांगव गावात गोठ्यात आढळले बिबट्याचे दोन बछडे

 

 

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील चिखली- रांगव गावात धनगरवाडीतील धोंडू जांगली यांच्या मालकीच्या गोठ्यात दोन बिबट्याची पिल्ले असल्याची माहीती मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच देवरूखचे वनपाल तौफिक मुल्ला, आपले सहकारी व मनसेचे जितू चव्हाण याचेसह घटनास्थळावर दाखल झाले.

 

त्यावेळी त्यांना वन्यप्राण्यांची २ पिल्ले आढळून आली. त्यातील १ नर जातीचा बछडा अर्धवट खाल्लेल्या स्थितीत मृत आढळून आला. तर दुसरा हि नर जातीचा बछडा जिवंत आढळून आला आहे. तो चांगल्या स्थितीत असून त्याला मादी घेवून जाईल या उद्देशाने त्याला नैसर्गिक अधिवासात ठेवून टूप कॅमेरे बसवून त्याचेवर पाळत ठेवली जात आहे, टूप कॅमेरे लावणे कामी वन्यजीव रक्षक निलेश बापट व वन्यजीव अभ्यासक प्रतिक मोरे व त्याच्या टिमने मदत केली.

मृत बठ्यावर पशुवैद्यकीय अधिकारी देवरूख यांचे कडून शवविच्छेदन करून घेण्यात आले. याप्रकरणी विभागिय वनाधिकारी दिपक खाडे, सहायक वनसंरक्षक चिपळूण सुनिल निखल यांचे मार्गदर्शनाखाली कार्यवाही करणेत आली व पुढील तपास सुरू आहे.

Comments