दिवाळीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी

रत्नागिरी : दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी चाकरमानी कोकणातील गावाकडे वळले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाल्याने खासगी गाड्यांपेक्षाही बहूसंख्य चाकरमान्यांचा कल कोकण रेल्वेकडे आहे; परंतु पुरेशा गाड्यांअभावी प्रवाशांना गावाकडे येण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्याचा अनुभव मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांनी नुकताच घेतला.
गणेशोत्सव, दिवाळी आणि शिमगोत्सव हे सण साजरे करण्यासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणात गावाकडे येतात. खासगी ट्रॅव्हल्स, खासगी गाड्या, एसटी आणि कोकण रेल्वे असे चार पर्याय निवडले जातात. गेले काही महिने मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामधून वाहने चालवत आणणे अडचणीचे होते. त्यामुळे चाकरमानी कोकण रेल्वेला पहिली पसंती देत आहेत. कमी खर्चात गावाकडे येण्याचा हा पर्याय आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी २२, २३ ऑक्टोबरला चाकरमानी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावाकडे आले आहेत.
तुतारी, कोकण कन्या, मत्स्यगंधा, दिवा-सावंतवाडी या गाड्यांना प्रचंड गर्दी होती. पाय ठेवायलाही जागा नाही अशी स्थिती प्रत्येक डब्यांमध्ये होती. काहींनी तर शोचालयाच्या दरवाज्यात उभे राहून प्रवास केला. मुंबईतून निघाल्यानंतर पनवेल ओलांडेपर्यंत प्रत्येक स्थानकावर प्रवासी डब्यात येत होते. आरक्षीत डब्यांमध्येही खच्चून गर्दी होती. अनुचित प्रकार टाळण्यासाठी रेल्वे पोलिस प्रत्येक स्थानकावर होते. काहींना तर तिकिट आरक्षित असतानाही डब्यात चढण्यासाठी कसरत करावी लागत होती. गणेशोत्सवाबरोबरच दिवाळीमध्येही जादा गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
Comments
Post a Comment