पुण्याच्या तरुणीवर मुंबईत लैंगिक अत्याचार, पोलिसांनी दिल्लीत जाऊन प्रियकराला ठोकल्या बेड्या
![]()
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करून पळून गेलेल्या आरोपी प्रियकराला मुंबईतील वाकोला पोलिसांच्या एका विशेष पथकाने थेट दिल्लीतून बेड्या ठोकल्या आहेत. गुरुविंदर तेजदरपाल सिंग असे आरोपीचे नाव असून तो मूळचा दिल्लीचा आहे.
पुणे: सध्याच्या डिजिटल युगात समाज माध्यमांवरून ओळख होऊन त्यात फसवणुकीचे आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. समाज माध्यमांवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पुण्याच्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Pune Young Woman Molested In Mumbai).
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करून पळून गेलेल्या आरोपी प्रियकराला मुंबईतील वाकोला पोलिसांच्या एका विशेष पथकाने थेट दिल्लीतून बेड्या ठोकल्या आहेत. गुरुविंदर तेजदरपाल सिंग असे आरोपीचे नाव असून तो मूळचा दिल्लीचा आहे.
पीडित तरुणी ही मूळची पुण्याची रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर तिची गुरविंदर सिंग याच्याशी ओळख झाली या ओळखीचे रूपांतर हळूहळू मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झाले. आधी सोशल मीडियावर चॅटिंग झाली आणि त्यानंतर एकमेकांचे नंबर शेअर करण्यात आले. गुरुविंदर याने आपण दिल्लीत एका नामांकित आयटी कंपनीत कामाला असल्याचं पीडितेला सांगितलं होतं.
दिवसेंदिवस या दोघांमधील बोलणे वाढत होते या बोलण्यामधूनच गुरुविंदर याने पीडितेला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर आपण कामानिमित्त मुंबईला येत आहोत अशी बतावणी करून पीडितेला पुण्याहून मुंबईला बोलावून घेतले. पीडितेलाही गुरविंदरला भेटायचे असल्याने या दोघांचं कल्याणमध्ये भेटण्याचे ठरलं. पीडित तरुणी देखील पुण्याहून कल्याणला पोहोचली आणि कल्याणमध्येच दोघांची भेट झाली.
त्यानंतर ते दोघेही कल्याणवरुन सांताक्रुज येथील वाकोला येथे आले. या ठिकाणी एका हॉटेलमध्ये गुरविंदरने आधीच रुम बुक करुन ठेवली होती. आपल्याला एकांतात बोलायचे आहे, असे सांगून गुरविंदर पीडितेला हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि त्याच ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या भेटीनंतर गुरविंदर दिल्लीला परत गेला. त्यानंतर पीडितेने अनेकदा गुरुविंदरला लग्नाविषयी विचारले असता तो टाळाटाळ करु लागला. गुरविंदरच्या प्रेमात पूर्णपणे अडकलेल्या पीडितेने थेट दिल्लीतील गुरुविंदरचं घर गाठलं. या ठिकाणी गुरविंदरचे कुटुंबीय आणि पीडितेमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर पीडितेने मुंबईला येऊन वाकोला पोलीस ठाण्यात गुरविंदविरोधात तक्रार दिली. या तक्रारीनंतर गुरुविंदर विरोधात पोलिसांनी फसवणुकीसह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होताच त्याला दिल्लीतल्या राहता घरातून अटक केली. अटक केल्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
Comments
Post a Comment