पावसामुळे दिवाळी खरेदीच्या प्लॅनिंगचा विचका होणार? यलो अलर्टमुळे हे दोन दिवस खरेदीसाठी 'प्रतिकूल'

 Mumbai Rain (5)

Mumbai Weather Updates | यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेला पाऊस हा गेल्या १० वर्षांमधील सर्वाधिक पाऊस आहे. गेल्या १० वर्षांमध्ये कधीच ऑक्टोबर महिन्यात इतक्या जास्त प्रमाणात पावसाचे प्रमाण पाहायला मिळाले नव्हते. यंदा दिवाळीचा सण नेहमीपेक्षा लवकर आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात परतीच्या पावसाचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार सोमवारी आणि मंगळवारी मुंबईत तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो.

 
मुंबई: दिवाळीच्या सणाला फक्त एक आठवडा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता सामान्य नागरिकांकडून दिवाळीच्या खरेदीला सुरुवात होईल. सोमवारपासून सुरु होणाऱ्या आठवड्यामध्ये स्थानिक बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. परंतु, मुंबईकरांच्या खरेदीच्या या प्लॅनिंगचा पावसामुळे विचका होण्याची शक्यता आहे. कारण, भारतीय हवामान खात्याने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी आणि मंगळवारी मुंबईत पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून संध्याकाळच्या वेळेत पावसाच्या जोरदार सरी बरसताना दिसत आहेत. त्यामुळे यलो अलर्टच्या काळात संध्याकाळी खरेदीसाठी बाजारपेठेत गेल्यास संपूर्ण प्लॅनिंग कोलमडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेला पाऊस हा गेल्या १० वर्षांमधील सर्वाधिक पाऊस आहे. गेल्या १० वर्षांमध्ये कधीच ऑक्टोबर महिन्यात इतक्या जास्त प्रमाणात पावसाचे प्रमाण पाहायला मिळाले नव्हते. यंदा दिवाळीचा सण नेहमीपेक्षा लवकर आला आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात परतीच्या पावसाचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार सोमवारी आणि मंगळवारी मुंबईत तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. तसेच वाऱ्यांचा वेग आणि विजांचा कडकडाटही अनुभवायला मिळू शकतो. हे एकंदरीत चित्र पाहता या आठवड्यातील किमान पहिले दोन दिवस तरी दिवाळीच्या खरेदीसाठी 'अनुकूल' नसल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरु झाली होती. परंतु, ही प्रक्रिया आता साधारण आठवडाभराने लांबली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील पंधरवडा उलटूनही सध्या मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. सांताक्रुझ वेधशाळेच्या माहितीनुसार, यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात मुंबईत २१६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा गेल्या १० वर्षांमधील सर्वाधिक पाऊस आहे. एरवी ऑक्टोबर महिन्यात मुंबईत सरासरी ९१ मिमीच्या आसपास पाऊस पडतो. यापूर्वी २०१२ साली मुंबईत ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे १९७.७ मिमी पाऊस पडला होता. मात्र, यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात हा विक्रम मोडीत निघाला आहे.

Comments