रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाची बाजी

रत्नागिरी : जिल्ह्यातील 36 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. निकालात शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) बाजी आहे. प्रतिष्ठेच्या व मोठ्या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने आपला ताबा ठेवला आहे. शिंदे गट व भाजपचा मात्र धोबीपछाड झाला आहे. निवडणुकीत शिंदे गटाला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये चिपळूण तालुक्यात संख्या जास्त आहे तर 36 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी पार पडली. सध्याचे राजकीय धुमशान बघता गावपातळीवरील निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे मतदार नेमका कोणाला कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे आणि उत्सुकतेचे ठरले होते.
राज्यात बंड नाट्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडामोडी झाल्या. जिल्ह्यात एकूण पाच आमदार आहेत. त्यापैकी खेडचे योगेश कदम, गुहागरचे भास्कर जाधव, रत्नागिरीचे उदय सामंत व राजापूरचे राजन साळवी हे चार सेनेचे आमदार आहेत. त्यापैकी सुरूवातीला योगेश कदम आणि त्यानंतर नाही नाही म्हणत उदय सामंत शिंदे गटात सामील झाले. यामुळे एकंदरीत 50 टक्के शिवसेना शिंदे गटात गेली, असे दावे करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यामुळे सर्वांचेच लक्ष याकडे लागले होते.
जिल्ह्याचा विचार करता शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) चांगले म्हणजे नंबर वनचा पक्ष ठरला आहे. ग्रामीण भागात आजही उद्धव ठाकरेंची जादू कायम आहे, हे दिसून आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष लागून राहिले होते ते रत्नागिरी विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतींकडे. कारण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिरगाव, पोमेंडी, फणसोप या ग्रामपंचायतींकडे स्वतः लक्ष दिले होते. शिरगावमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे गट अशी लढत पाहायला मिळाली. यामध्ये मात्र महाविकास आघाडीने बाजी मारत सरपंचपद राखले. तर पोमेंडी व फणसोपमध्ये शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट अशी लढत पहायला मिळाली. यामध्ये ठाकरे गटाने एकतर्फी सत्ता मिळवली. यामुळे उदय सामंत यांना चांगलाच धक्का मिळाला आहे. या निकालावरून ग्रामीण भागात उद्धव ठाकरे यांची सेनाच पॉवरफुल असल्याचे दिसून येत आहे.
Comments
Post a Comment