शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची कुणबी सेनेची मागणी

 रत्नागिरी : परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातशेती पूर्णपणे आडवी झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांच्या नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी कुणबी सेना पदाधिकाऱ्यांनी चिपळूणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कुणबी समाज पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोकणातील शेतकरी शेतीवर अवलंबून असतो. त्याचे उपजीविकेचे साधन शेती आहे. कोकणात सुमारे ९० टक्के हळव्या जातींची भातशेती केली जाते. ही भातशेती पूर्णत: बहरली असून भात कापणीस तयार झाले असतानाच परतीच्या पावसामुळे भातशेती कापणी लांबणीवर पडली आहे. पावसामुळे बहरलेली उभी भातशेती जमीनदोस्त होत असून यात शेतीचे नुकसान होऊ लागले आहे. यामुळे बळीराजा हताश झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना मदत करून शासनाने दिलासा द्यावा.

यावेळी कुणबी सेनेचे तालुकाध्यक्ष संजय जाबरे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप उदेग, गजानन वाघे, महेश नाचरे आदी उपस्थित होते.

Comments