वैभव नाईकांच्या मालमत्तेत ३०० पटींनी वाढ; नितेश राणेंनी सादर केली कागदपत्रे

 

सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरेंच्या भटक्या कुत्र्यांनी कुडाळमध्ये आमच्यावर भुंकण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे हे नपुंसक आहेत. स्व. बाळासाहेबांसारखा थेट हल्ला करण्याचे धाडस उद्धव ठाकरे मध्ये नाही. उद्धव ठाकरेंना असे सोंगाडे लागतात अशा खरमरीत शब्दांत आक्रमक झालेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंवर व आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक, यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. कणकवली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या काही वर्षात आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेत ३०० पटींनी कशी वाढ झाली याबाबतची कागदपत्रच आमदार नितेश राणे यांनी सादर केली.

यावेळी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना आमदार नितेश राणे म्हणाले, आईस्क्रीम कोनचा आणि आदित्य ठाकरेचा काय संबंध हे दिनो मोरयाला विचारा. दोघेही रिझवी कॉलेजच्या मागे बसून हे आईस्क्रीम कोन खायचे. उद्धव ठाकरे यांचे रक्त थंड आहे. म्हणूनच त्याला आईस्क्रीम कोन निशाणी निवडणूक आयोगाने दिली. भास्कर जाधव शिक्षकाचा मुलगा स्वतःला म्हणवतात. पण शिक्षकांचा मुलगा असा करंटा कसा निघाला ? आमदार वैभव नाईकची एसीबी चौकशी का सुरू आहे? एकीकडे चोरीमारी करून वैभव नाईक दोन नंबरची संपत्ती गोळा करायची आणि दुसरीकडे ही भटकी कुत्री येऊन राणेंवर गरळ ओकायची. सोंगाड्याना एकत्र करून नंगा नाच आज कुडाळात केला.

मुद्दा वैभव नाईकांच्या एसीबी चौकशीचा होता. वैभव नाईक यांनी जनतेसमोर जाऊन आपण स्वच्छ प्रतिमेचा असल्याचे जाहीर करणे गरजेचे होते. मात्र राणे आणि भाजपावर तोंडसुख घेण्याचे मोर्चा काढून सुख घेतले. वैभव नाईकची तक्रार करणारा प्रदीप भालेकर हा खासदार विनायक राऊत यांचा माणूस होता. मग भालेकरला वैभव नाईकविरोधात तक्रार द्यायला खासदार राऊत यांनीच भाग पाडले या माझ्या मुद्द्यावर विरोधक का बोलले नाहीत? असा सवाल नितेश राणेंनी केला.

नितेश राणेंनी पत्रकार परिषदेत वैभव नाईक यांचे निवडणूक वेळी सादर केलेले प्रतिज्ञापत्र सादर करत नाईक यांची २००९ साली प्रॉपर्टी ५० लाख ते १ कोटीची होती. २०१४ साली नाईक यांची हीच प्रॉपर्टी एक कोटी वरून आठ कोटींवर पोचली. २०१९ मधील निवडणूक प्रतिज्ञापत्रात आमदार नाईक यांनी आपली प्रॉपर्टी २५ कोटींची असल्याचे सांगितले आहे. ह्या अधिकृत प्रॉपर्टी आहेत, तर बेनामी प्रॉपर्टी १४० ते १५० कोटींची असल्याचा दावा आमदार नितेश राणेंनी केला. ही वाढलेली संपत्ती वैभव नाईक आणि चिपळूण वरून भाड्याने आलेल्या भटक्या कुत्र्यांनी एसीबीला उत्तर द्यावे. त्याऐवजी केंद्रीयमंत्री राणे, माजी खासदार निलेश राणे आणि माझ्यावर तसेच भाजपावर दात चावण्याला काय अर्थ ? असा सवालही नितेश यांनी केला.

 

Comments