कोकण नेस्ट रिसॉर्टमध्ये प्रथमच रंगली दीपावली संध्या
रत्नागिरी : गणपतीपुळ्याजवळील निवेंडी येथील पर्यटनाचा मानबिंदू असलेल्या डॉ. निमकर्स कोकण नेस्ट रिसॉर्टमध्ये दिवाळी पाडव्याला दीपावली संध्या रंगली. मराठी स्वरांनी, सुरांनी परिसर एकदम सुरेल होऊन गेला.
कोकण नेस्टमध्ये पहिल्यावहिल्या स्वरयात्री प्रस्तुत दीपावली संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मैफिलीत प्रसिद्ध गायक विवेक बापट, गायिका योगिता दिवेकर, सो, आदिती केळकर यांच्या निरागस सुरांनी पर्यटक, रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या कोकण नेस्टच्या संचालिका गोरीताई वेलणकर आणि संचालक डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या कल्पनेतून दीपावली संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणीचे पूर्व संचालक श्रीकांत ठकार, शिरीष वेलणकर या मैफिलीस आवर्जून उपस्थित होते. प्रसिद्ध कलाकार पर्णिका भडसावळे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने कोकण नेस्टचा परिसर मराठमोळ्या संस्कृतीने नटलेला दिसत होता. पणत्या, रांगोळ्या, आकाश कंदील, थंडीची हलकी लाट अशा सुरेख वातावरणात मराठी स्वरांनी उपस्थितांना मोहवून टाकले. मैफिलीच्या पूर्वरंगात कृष्ण आणि पांडुरंग यांच्या व्यक्तिमत्वाच्या उटा दर्शविणाऱ्या गीतांची उधळण आणि उत्तर रंगात नाट्यसंगीत, भावगीत, अभंग अशा सुरावटींचे सादरीकरण उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले.
Comments
Post a Comment