राणे पिता-पुत्र बदनामी प्रकरणी भास्कर जाधवांना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र नीलेश व नितेश यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी येथील न्यायालयाने शिवसेना नेते भास्कर जाधव यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) कारवाई केली होती. त्याच्या विरोधात भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी केलेल्या भाषणामध्ये भास्कर जाधव यांनी नारायण राणे, नीलेश व नितेश राणे यांच्यावर जोरदार आणि आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावर पुण्यातील भाजप कार्यकर्त्याने सामाजिक भावना भडकावल्याचा आरोप करत डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाकडून हंगामी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आमदार भास्कर जाधव यांच्या वतीने डॉ. विजयसिंह ठोंबरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सुनावणीवेळी ठोंबरे यांनी न्यायालयाला सांगितले की, भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांविरुद्ध वैयक्तिक टीका केली होती. भास्कर जाधव यांनी कोणत्याही समाज, जात, धर्माविरुद्ध टीका केली नाही. तसेच, भास्कर जाधव यांचा आवाज दाबण्यासाठीच त्यांच्यावर खोटी कलमे लावून राजकीय दबावातून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही भास्कर जाधव यांच्याकडून करण्यात आला. भास्कर जाधव यांच्या वकिलाचा युक्तीवाद मान्य करुन जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी काही अटी व शर्तीवर आमदार भास्कर जाधव यांना हंगामी अटकपूर्व अर्ज मंजूर केला आहे.
Comments
Post a Comment