कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात दिवाळी हस्तकला प्रदर्शन सुरु

 

रत्नागिरी : येथील कै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात दिवाळी हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन प्रतिथयश सीए. एच. एल. पटवर्धन यांनी गुरुवारी केले. या वेळी शहर वाचनालय व महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. मोहिनी पटवर्धन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

 

याप्रसंगी सीए पटवर्धन यांनी शाळेत तयार केल्या जाणाऱ्या सर्व वस्तू, विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे चालते, यशस्वी विद्यार्थी, वैवाहिक व व्यावसायिक पुनर्वसन, कार्यपद्धतीची माहिती घेतली. उद्घाटन केल्यावर सीए. एच. एल. पटवर्धन म्हणाले की, मूकबधिर शाळेचे पण ओडिट केले आहे, इतक्या उत्कृष्टपणे शाळा चालते याची मला खरंच कल्पना नव्हती. आज मी पाहिलं हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन अतिशय उत्तम आहे. प्रत्येक वस्तू सर्वोत्तम आहे. जे बोलताहेत, ऐकताहेत त्यांनासुद्धा एवढ्या कलात्मक वस्तू करता येणार नाहीत. असे उत्तम काम केले आहे. पालक, शिक्षक व संस्था पदाधिकाऱ्यांचे कौतुक करतो. अशीच भरभराट होवो, उत्तम नोकरी मिळो, आपण स्वावलंबी व्हावे.

महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. मोहिनी पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या. की प्रवेशद्वारातून आत आल्यावर सुरेख किल्ला, नंतर रांगोळीने स्वागत झाले. तिथूनच प्रदर्शन सुरू झाले. पायऱ्यांवर पाढे, बेरीज, वजाबाकी, विविध अभ्यासाची माहिती, विविध चित्रे यातून सहज ज्ञान प्राप्त होईल, असे रेखाटले आहे. प्रदर्शन खूप उत्तम आहे. मन लावून बारीकसारीक कलाकुसर छान आहे. खूप सुंदर उपक्रम आहे. या वेळी दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे यांनी माझे सासरे नाना भावे यांनी लायन्स क्लबचे जयवंत भिडे यांच्या संकल्पनेतून शाळा उभारती. इथले विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहतील, यासाठी शाळा व संस्थेतून प्रयत्न केले जात आहेत. येथे विद्यार्थ्यांना सुतारकाम, मातीकाम, शिवणकाम यासह गृहिणीसाठी लागणारे शिक्षणही दिले जाते असे सांगितले.

Comments