दोन सख्ख्या भावांवर प्रेम जडलं, घरच्यांचा नकार, मग काय हातात हात घेत तिघेही फरार...

 love triangle

Uttar Pradesh News: या तरुणीचे दोन्ही भावांवर जीवापाड प्रेम होते, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. घरातील वडीलधाऱ्यांना याची माहिती मिळताच घरात एकच गोंधळ झाला. तिघांनाही त्यांच्या घरच्यांनी खडसावले आणि प्रकरण संपवलं.

लखनऊ: उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक प्रेमकहाणी समोर आली आहे. ही कथा वाचल्यानंतर तुम्हाला अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांचा बॉलिवूड चित्रपट 'गुंडे' नक्कीच आठवेल. जिथे २५ वर्षांची मुलगी दोन सख्ख्या भावांच्या प्रेमात पडली. त्यानंतर तिघेही घर सोडून पळून गेले. मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन न्यायाची मागणी केली आहे. हे संपूर्ण प्रकरण बरेलीच्या शेरगड पोलीस ठाण्याचे आहे. पोलिसांनी तिघांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या अनोख्या प्रेमकथेची चर्चा सध्या जोरात सुरु आहे.
 
या तरुणीचे दोन्ही भावांवर जीवापाड प्रेम होते, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. घरातील वडीलधाऱ्यांना याची माहिती मिळताच घरात एकच गोंधळ झाला. तिघांनाही त्यांच्या घरच्यांनी खडसावले आणि प्रकरण संपवलं. मात्र तिघांचेही एकमेकांवर इतकं प्रेम होतं की तिघेही घर सोडून पळून गेले.
 
बेपत्ता तरुणीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु केले. तपासादरम्यान, दोन्ही भावांनी मुलीला त्यांच्या मामाच्या घरी नेल्याचे पोलिसांना समजले. यानंतर दोन्ही कुटुंबात मोठा वाद उफाळला आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या मामाविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. सध्या तिन्ही प्रेमीयुगुल कुठे आहेत, याचा शोध पोलिसांना लागलेला नाही.
 
एसएचओ विक्रम सिंह यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांचाही शोध सुरु आहे. त्यांचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे. लवकरच दोन्ही आरोपींना अटक करण्यात येईल. हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी निगडित असल्याने पोलीस अधिकारीही या संपूर्ण प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत.

Comments