मोठी बातमी: संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका, एअर अ‍ॅम्ब्युलन्सने तातडीने मुंबईला रवाना

 Sanjay Shirsat

Maharashtra Politics | शिरसाट यांना सोमवारी दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. मात्र, त्यानंतरही संजय शिरसाट यांच्या प्रकृतीत सुधारण होत नसल्याने आता त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. औरंगाबाद विमानतळावरून मंगळवारी सकाळी संजय शिरसाट एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

औरंगाबाद: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. शिरसाट यांना सोमवारी दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. मात्र, त्यानंतरही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या प्रकृतीत सुधारण होत नसल्याने आता त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे. औरंगाबाद विमानतळावरून मंगळवारी सकाळी संजय शिरसाट एअर अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यावेळी औरंगाबाद विमानतळावर संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
 
प्राथमिक माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडली होती. काल दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी ढासळली. सध्या संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याचवेळात संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयात जाणार आहेत.
 

कोण आहेत संजय शिरसाट?


संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सर्वप्रथम पाठिंबा देणाऱ्यांमध्ये संजय शिरसाट यांचा समावेश होता. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात शिरसाट यांना संधी दिली जाईल, असे बोलले जात होते. परंतु, मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने संजय शिरसाट प्रचंड संतापले होते. त्यानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही रखडलाच आहे. त्यामुळे संजय शिरसाट हे अस्वस्थ असल्याची चर्चा होती. त्यांनी भर बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली होती. संजय शिरसाट हे २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन टर्ममध्ये औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
 
राजकारणात येण्यापूर्वी संजय शिरसाट हे रिक्षाचालक होते. १९८५ साली त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. २००० साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २००३ मध्ये संजय शिरसाट यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली होती. २००५ मध्ये ते पुन्हा नगरसेवक बनले होते. त्यानंतर २००९ साली पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले होते.

Comments