रत्नागिरी शहरातील रस्त्यांविषयी भाजपा आक्रमक

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता भारतीय जनता पार्टीने या विषयावर आवाज उठवला आहे. विशेष करून रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, प्रमोदजी महाजन क्रीडांगणासमोरील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून परिसरातील लोकांना वाहने चालवण्यास प्रचंड नाहक त्रास होत आहे.
तसेच पादचाऱ्यांना देखील याचा त्रास होत असून जनभावना लक्षात घेता रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 आठवडा बाजार प्रमोद महाजन क्रीडांगण ते वैभव हॉटेल पर्यंतचा हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे नागरिकांची नाराजी पाहता संबंधित रोड करणारे कॉन्ट्रॅक्टर यांना ब्लॅक लिस्ट करून त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांचे बिल देण्यात येऊ नये; अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी व जनसामान्य जनतेच्या वतीने नवीन रस्ता करण्याबाबत निवेदन देण्यात आले. या रस्त्याचे काम तातडीने न झाल्यास व संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास भारतीय जनता पार्टी आक्रमक भूमिका घेईल असे खडसावून सांगण्यात आले.
रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाकडे सदरचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष सचिन करमरकर, माजी नगरसेवक राजेश तोडणकर, सुशांत चवंडे, संदीप सुर्वे, विक्रम जैन, सोनाली आंबेरकर, निलेश आखाडे, सचिन गांधी, प्रवीण देसाई, विश्वनाथ केळकर, दादा ढेकणे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment