लांजातील फ्रेंड्स ग्रुपतर्फे कोकणातील सर्वांत मोठा दीपोत्सव साजरा; १७,७७७ दीप

रत्नागिरी : चराचरात लखलखणारा प्रकाश साठवून ठेवण्याची प्रेरणा देणार्या दीपावलीचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन लांजा येथील फ्रेंड्स ग्रुपने सलग १७ व्या वर्षी कोकणातील सर्वांत मोठा आणि महाराष्ट्रातील तृतीय क्रमांकाचा दीपोत्सव उत्साहात साजरा केला. यावेळी १७ हजार ७७७ दीप प्रज्वलित करून लांजा शहर प्रकाशमय करण्यात आले.
दीपोत्सव म्हणजे आनंद, उत्साहाचे उधाण. म्हणूनच फ्रेण्डस् ग्रुपतर्फे दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. ऐतिहासिक शनिवारवाडा आणि कोल्हापुरातील रंकाळा या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या दीपोत्सवापाठोपाठ महाराष्ट्रातील तृतीय क्रमांकाचा दीपोत्सव म्हणून लांज्यातील दीपोत्सवाची नोंद केली जाते.
या अनोख्या दीपोत्सवाचे उद्घाटन राजापूरचे आमदार राजन साळवी आणि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंतभाऊ शेट्ये यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपनगराध्यक्षा पूर्वा मुळे, नगरसेविका यामिनी जोईल, नगरसेवक नंदराज कुरूप, स्वरूप गुरव, गुरुप्रसाद देसाई, वैभव जोईल, राजेंद्र धावणे, राजेश शेट्ये, विश्वनाथ मांगले, संजय यादव, बापू लांजेकर, संजय बावधनकर आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार साळवी यांनी सांगितले की, तब्बल १७ वर्षे कोकणातील सर्वांत मोठ्या दीपोत्सवाचे आयोजन करून भारतीय समृद्ध परंपरेची जोपासना करणाऱ्या फ्रेण्डस् ग्रुपचे कौतुक करावे तेवढेच थोडेच आहे. समाजाच्या जीवनातील अंधकार दूर व्हावा या हेतूने आयोजित केलेला हा दीपोत्सव लांज्याची सांस्कृतिक ओळख आहे.
जयवंतभाऊ शेट्ये यांनी तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या दीपोत्सवाचे कोतुक केले. दीपोत्सवाच्या निमित्ताने लांज्यातील क्रियाशील, निरपेक्षपणे काम करणाऱ्या संस्थांचा आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्या सर्वांचे अभिनंदन श्री. शेट्ये यांनी केले. यापुढेही समाजमनाच्या सदृढतेसाठी दीपोत्सवाला सहकार्य राहील, असे अभिवचन त्यांनी दिले.
दीपोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत यंदा रोप्य महोत्सवी वर्ष साजरे करणारे संदीप स्मृती मित्रमंडळ, लांज्यातील शैक्षणिक विकासासाठी निरपेक्षपणे झटणारी माजी विद्यार्थी असोसिएशन, फणसकिंग हरिश्चंद्र देसाई, शशांक उपशेटे, व्हेळ हायस्कूलचे गणिता शिक्षक महेंद्र साळवी यांना फ्रेण्ड्स रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणावर डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे निवेदन समन्वयक विजय हटकर यांनी केले. यावेळी कलाशिक्षक अजित गोसावी यांच्या संकल्पनेतून रेखाटण्यात आलेली संस्कारभारती व देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मध्यभागी लाल किल्ल्याची रांगोळी सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरली. यावेळी ऑप्सम डान्स ग्रुपच्या बालकलाकारांनी दीपोत्सव कल्पनेवर केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन झाले.
Comments
Post a Comment