वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षाचालकाला शिक्षा

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील रस्त्यावर वाहने थांबवून बाचाबाची, आरडा-ओरडा करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या रिक्षा चालकाला न्यायालयाने बुधवारी चारशे रुपये दंड, तो न भरल्यास सात दिवस कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना १८ सप्टेंबर २०१९ रोजी रात्री ९.३० वा. सुमारास घडली होती.
जिक्रिया अब्दुल रहमान खांचे (वय ४६, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी रिक्षा चालकाचे नाव आहे. १८ सप्टेंबर रोजी तो आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८ क्यू०२८८) घेऊन रत्नागिरीकडे येत होता. त्यावेळी अशोक विश्वनाथ गदळे (वय ४२, रा. चिंचोळी, जि. बीड) हे आपल्या ताब्यातील लक्झरी (एमएच १२ एक्यू ३५७४) घेऊन येत असताना दोघांमध्ये रस्त्यात बाचाबाची झाली. दोघांनीही वाहने रस्त्यात इतर वाहनांना अडथळा होईल, अशी लावून ठेवली होती. तसेच सार्वजनिक ठिकाणी दोघांनीही असभ्य वर्तन केल्याप्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल कौस्तुभ जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यावरून पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला होता. तपासात पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. बुधवारी या खटल्याचा निकाल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सातव यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले.
रिक्षाचालक जिक्रिया खांचे यांनी न्यायालयात गुन्हा कबूल केल्याने त्यांचा खटला न्यायालयाने वेगळा करून या गुन्ह्यात ४०० रुपयांचा दंड व दंड न भरल्यास सात दिवसांची कारावासाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार दुर्वास सावंत व महिला पोलिस नाईक टी. सीता वाढावे यांनी काम पाहिले.
Comments
Post a Comment