सावधान! मुंबईत पुन्हा वाढू शकतो करोना; तज्ज्ञांनी दिला 'हा' गंभीर इशारा

coronavirus-1

Coronavirus In Mumbai: मुंबईत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते असा इशारा देण्यात आला आहे. चीनमध्येही नव्या व्हेरियंटमुळं पुन्हा लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर राज्यातही आरोग्य विभागाने पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

 

मुंबईः करोना संसर्गाच्या साथीने नागरिकांचे कंबरड मोडलं होतं. गेल्या दोन वर्षांपासून भारतासह जगभरात हाहाकार माजवणाऱ्या करोना संसर्गावर आता नियंत्रण मिळवण्यात आरोग्य प्रशासनाला यश आलं आहे. करोना संसर्ग नियंत्रणात आला असला तरी करोनाची साथ अद्याप पूर्णपणे नष्ट झाली नाहीये. मुंबईसह महाराष्ट्रात करोना पुन्हा उचल खाऊ शकतो, अशी भिती आरोग्य विभागाने वर्तवली आहे. थंडीच्या दिवसात करोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. (Coronavirus Update In Mumbai)

पावसाळ्यानंतर आता मुंबईत थंडीची चाहूल लागल्याने हवेत गारठा वाढला आहे. त्यामुळं थंडीत पुन्हा करोनाचे रुग्ण वाढू शकतात, अशी भिती हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, त्याची तीव्रता ही २०२० आणि २०२१मध्ये आलेल्या करोनाच्या लाटेपेक्षा कमी असेल, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

 
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हिवाळ्याच्या पुढील काही महिन्यांत रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्य निरीक्षण अधिकारी डॉ. प्रदिप आवटे यांनी ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर करोनाचा XBB हा नवीन व्हेरियंटचे नमुने रुग्णांमध्ये आढळल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले आहे. या व्हेरियंटमुळं रुग्ण संख्येत वाढ होऊ शकते, असं ते म्हणाले आहेत.

आरोग्य विभागाने रुग्णवाढीचा इशारा जरी दिला असला तरी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राची स्थिती दिलासादायक आहे. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात दैनंदिन रुग्णांची संख्या ही ५०० च्या जवळपास पोहोचली आहे. हे प्रमाण मागील पंधरवड्यांपर्यंत २० टक्क्यांनी कमी होते. तर, मुंबईत गेल्या काही दिवसांत रुग्णवाढीची संख्याही २००च्या जवळ आहे. शनिवारी राज्यात ४६२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील १८० रुग्ण मुंबईत सापडले आहेत. 

Comments