भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी तपासासाठी पोलिसांची ७ पथके तैनात

 

चिपळूण : शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या 'सुवर्णभास्कर' या बंगल्यावर हल्ल्याचा प्रयत्न प्रकरणात पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. तपासासाठी तब्बल ७ पथके पोलिसांनी तैनात केली असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तसेच सीडीआर पोलिसांनी जमा केले आहेत. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी काही संशयितांची चौकशी केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाची उकल होण्याची शक्यता आहे.

आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण पाग येथील 'सुवर्णभास्कर' या बंगल्यावर मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बंगल्याच्या परिसरात दगड, स्टम्प आणि पेट्रोलच्या बाटल्या आढळल्याने हा पेट हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. हा हल्ला भाजप कार्यकर्ते राणे समर्थकांनी केला असल्याचा पेट आरोप करत आठ संशयितांची नावेही पोलिसांना दिली आहेत. यामध्ये भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

आमदार जाधव यांचे पुत्र समीर जाधव यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी त्यांनी तपासाला वेग दिला आहे. ठसे तज्ज्ञांनी नमुने घेऊन परीक्षणासाठी पाठवले आहेत, तर श्वान पथकाने घराच्या परिसरात किमान २०० मीटर अंतर पिंजून काढला. या प्रकरणी तपास वेगाने व्हावा म्हणून आता पोलिसांची तब्बल ७ पथके तैनात करण्यात आली आहेत.

Comments