ठाकरे-शिंदे-फडणवीस एकत्र! 3 दिग्गज सोबत येणं महायुतीची नांदी? एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

शिवाजी पार्कवरील मनसेच्या कार्यक्रमात राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर
शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) 3 दिग्गज एका कार्यक्रमात एकत्र आल्यानं ही महायुतीची नांदी आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. मनसेच्या कार्यक्रमात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच व्यासपीठावर शुक्रवारी दिसून आले होते. शिवाजी पार्कवर मनसेच्या झालेल्या दीपोत्सव कार्यक्रमात तीन नेते एकत्र आल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
गणेशोत्सवापासूनच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या राज ठाकरे यांच्यासोबतच्या गाठीभेटी वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस यांना लिहिलेल्या विनंती पत्रांचाही सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला होता. तसंच मनसेच्या पोस्टरवर शिंदे-फडणवीस यांचे पोस्टर शुक्रवारी शिवाजी पार्कमध्ये पाहायला मिळाले होते. त्यामुळे शुक्रवारी मनसेच्या व्यासपीठावर तीन नेते एकत्र दिसल्यानं चर्चांना उधाण आलं नसतं, तरच नवल!
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरेंच्या निमंत्रणाला मान देऊन मी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दीपोत्सव कार्यक्रमाला आलो होतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. दीपोत्सव कार्यक्रमाचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी म्हटलंय.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची विनंती राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना केली होती. तसं पत्रही लिहिलं होतं. राज ठाकरेंच्या विनंतीला भाजपनेही मान दिला होता. त्यानंतर आता दीपोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने तिन्ही नेते एकत्र एकाच व्यासपीठावर दिसून आलेत.
Comments
Post a Comment