लांबलेल्या पावसाने 25 हेक्टरवरील हळव्या भातशेतीला धोका

 Wheat farming

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीभागातील पावसाचा परतीचा प्रवास लांबण्याची शक्यता असल्यामुळे ऐन खरिपाच्या महत्त्वाच्या टप्प्यातील म्हणजेच कापणीच्या हंगाम चिंता वाढविणारा ठरण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील हळव्या भाताची लागवड धोक्यात आली आहे. या बाबत तातडीने पीकस्थितीची पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत.

परतीच्या पावसाच्या सातत्याने उभी भातपिके आडवी पडली झाली आहेत. त्यामुळे अद्यापही काही भगात कापणी सुरू झालेली नाही. कापणी करुनही पीक सुरक्षित ठेवण्याच्या अडचणी शेतकऱ्यासमोर आहेत तर उभे पीक ठेवल्यासही लोंब्यांना मोड येण्याची भीती आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 हजार हेक्टरवरील हळव्या भाताला पावसाचा तडाखा बसू शकतो.

राजापूर, लांजा, रत्नागिरी तालुक्यातील पावस, गोळप, काळबादेवी, कासारवेली, हातखंबा, करबुडे, निवळी, संगमेश्वर, चिपळूणसह अन्य तालुक्यातही पावसाने उभी भातपिके आडवी पडली आहेत. 110 दिवसांनी तयार होणारी हळवी भातबियाणे कापणीसाठी तयार झाली आहेत. जिल्ह्यात 68 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली असून, सुमारे 25 हेक्टरवर हळवी बियाणे आहेत. सलग तीन दिवस तयार झालेले पीक पावसाच्या साचलेल्या पाण्यात भातांची रोपे आडवी पडून राहिल्याने ती पुन्हा रुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसात भिजलेले भात कापून झोडले तर तांदूळ काळा पडतो आणि तो खाण्यायोग्य राहात नाही. दरम्यान, पाऊस असाच सुरू राहिला तर हळव्या भातपिकाचे मोठे नुकसान होईल, असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे.

Comments