रत्नागिरी जिल्ह्यात मनरेगाने फळबागांचे क्षेत्र वाढले, पाच वर्षात २० हजार २९० हेक्टर लागवड

रत्नागिरी दि.२५:-भातशेतीवर अवलंबून असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात फळबागाही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला रोजगार हमी योजनेतंर्गत (मनरेगा) बळकटी देण्याचे काम जिल्हा प्रशासन करीत आहे.  यातून गेल्या पाच वर्षामध्ये जिल्ह्यात २० हजार २९० हेक्टर क्षेत्र फळबागांखाली आले आहे. 
जिल्ह्यात मुख्यत्वे करुन कृषी विभाग आणि ग्रामपंचायती यांच्या सहाय्याने फळबाग लागवड करण्यात येते.  मनरेगा अंतर्गत जिल्ह्याची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय अशी आहे. 
जिल्ह्यात नऊ तालुके आहेत यात एकूण ग्रामपंचायतींची संख्या ८४६ इतकी आहे.  मनरेगा अंतर्गत नोंदणीकृत मजूरांची संख्या ४ लाख ४८ हजार ९२७ इतकी आहे.  नोंदणीकृत एकूण घरांची संख्या २ लाख ३६ हजार ८६३ असून यात १ लाख ७६ हजार ३८४ जॉब कार्ड धारक आहेत.  
जिल्ह्यात प्रत्यक्षात सक्रीय जॉबकार्ड धारकांची संख्या ५४ हजार ८४८ आहे आणि सध्या सुरु असणाऱ्या कामांवर मजूर उपस्थिती ४ हजार २८२ इतकी आहे.  एकूण सुरु कामांची संख्या १ हजार २०३ आहे.  सध्या मजूरांना २५६ रुपये प्रतिदिन या दराने मजूरी अदा करण्यात येते 
सुरु असलेल्या कामांमध्ये कृषी विभागाची ६४१ कामे चालू आहेत.  यावर १ हजार ८३२ मजूरांची उपस्थिती आहे.  ग्रामपंचाती अंतर्गत ५१३ आणि सामाजिक वनीकरणाची ४९ कामे सध्या सुरु आहेत.  या कामांवर अनुक्रमे २ हजार २०६ आणि २४४ मजूरांची उपस्थिती आहे. 
मनरेगा अंतर्गत गोठे, फळबाग, घरकुल, विहीरी, गांडूळखत प्रकल्प शोषखड्डे, गाळ उपसा आणि रस्ते आदी कामे घेण्यात येतात यात जिल्ह्याची गरज लक्षात घेवून फळबागांच्या कामास प्राधान्य देण्यात आलेले आहे.  
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये फळबाग काम मोठ्या प्रमाणावर झाले याची वर्षनिहाय हेक्टरी लागवड खालीलप्रमाणे आहे. 
सन २०१७-१८: ४९८४.१६ हेक्टर 
सन २०१८-१९: ५८९३.९१ हेक्टर
सन २०१९-२०: ४१४९.२० हेक्टर
सन २०२०-२१: ३१३०.९५ हेक्टर
सन २०२१-२२: २२३२.६९ हेक्टर
एकूण २०3९०.९१ हेक्टर 

Comments