माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी पाचल भागातील कार्यकर्त्यांसह कार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट, ओणी-पाचल-विठापेठ रस्ता डांबरीकरणाबाबत केली सविस्तर चर्चा

राजापूरातील पाचल विठापेठ रस्त्याचे काम रखडले असून याबाबत या भागातील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. यासंदर्भात प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस व राजापूरच्या माजी विधान परिषद आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी नुकतीच रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी भेट घेतली. यावेळी अॅड. हुस्नबानू खलिफे यांनी पाचल रस्त्याचे नेमके काम का रखडले आहे?, निविदा निघूनही कामाची वर्क ऑर्डर का काढण्यात आलेली नाही? असा सवाल उपस्थित केला. जून महिन्यापासून पावसाळा सुरु होईल. या काळात रस्ता डांबरीकरण होणार नाही. याचा परिणाम म्हणून या मार्गावरुन प्रवास करणा-या प्रवाशांना, पाचल भागातील ग्रमास्थांना खुप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या कामाला लवकरात लवकर सुरुवात झाली नाही तर जनता अधिक आक्रमक पवित्रा घेईल. त्यानंतर जनतेने आक्रमक पवित्रा घेतल्यास आणि त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी उपस्थित केला.
पाचल विठापेठ या मार्गावर असंख्य खड्डे पडले असल्याने या मार्गाचे डांबरीकरण होणे अत्यावश्यक होते. यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस व माजी विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन रस्ता डांबरीकरणासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर प्रशासकीय पातळीवरही त्यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाना यश येऊन सदर रस्त्यासाठी सुमारे 7 कोटी 44 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. आता याची निविदा काढण्यात आली आहे. मात्र या रस्त्याची वर्क ऑर्डर काढुन रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्याने लोकांमध्ये असंतोश निर्माण झाला होता. त्यामुळे पाचल भागातील शिष्टमंडळाने नुकतीच माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या श्रीम.पुजारी यांनी या रस्त्याची वर्क ऑर्डर 25 एप्रिल रोजी काढण्यात येईल असे सांगितले. 
या भेटी दरम्यान पाचलचे उपसरपंच किशोर नारकर, तुषार पाचलकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments