राजापूर शहरातील छ.शिवाजी महाराज रस्त्याच्या कामातील दिरंगाईमुळे वाहनचालक व व्यापारी त्रस्त: माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांचे मुख्याधिका-यांना निवेदन

राजापूर शहरातील छ.शिवाजी महाराज रस्त्याच्या कामात दिरंगाई होत असल्याने वाहन चालकांसह व्यापारी, नागरीक यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा माजी नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्यासह सर्व माजी नगरसेवक व नागरीकांनी दिला आहे. राजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या काँकीटीकरणाचे काम दि.12 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे. गेले दिड महिन्यापेक्षा जास्त काळ हे काम सुरू असून यासाठी शहरातील नागरिक, व्यापारी, खोकेधारक, वाहन चालक यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे व करत आहेत. रस्त्यालगत असलेल्या व्यापा-यांनी व खोकेधारकांनी आपली दुकाने, खोके बंद ठेवून सहकार्य केलेले आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने रिक्षाचालक व दुचाकी स्वारांनी बाजारपेठेतून मार्ग काढतानाकसरत करावी लागत आहे. शहरातील वाहतूकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या रस्त्याचे काम तातडीने आणि वेळेवर पुर्ण करण्याची आवश्यकता असतानाही संबधित ठेकेदाराकडून या कामाला विलंब लावला जात आहे. बाजारपेठेतील जोड़ रस्त्यांची कामे अर्धवट असल्याने बाजारपेठेतीतील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. तर अनेक ठिकाणी गटारांचे काम पूर्ण न केल्यामुळे व उघड्या गटारांमुळे अपघात होत आहेत. नुकताच एका उघड्या गटारात बैल पडून जखमी झाल्याची घटना घडली होती. याबाबत आम्ही निर्देश दिल्यानंतर या गटारांवर तात्पुरत्या स्वरूपात जुन्या गंजलेल्या जाळ्या टाकण्यात आलेल्या आहेत. तसेच रस्त्यावर टाकलेल्या ओल्या गवतामुळे दुचाकी स्वारांना कसरत करावी लागत आहे. शहरातील या महत्वपुर्ण रस्त्यांच्या कामात होत असलेली दिरंगाई ही चुकीची असून नागरिकांतून प्रशासन व संबंधीत ठेकेदारविरुध्द नाराजी व्यक्त होत आहे. तरी या आठवडाभरात याबाबत योग्य प्रकारे कार्यवाही झाली नाही तर या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर माजी नगराध्यक्ष ॲड.खलिफे यांच्यासह माजी नगरसेवक सुलतान ठाकूर, संजय ओगले, व्यापारी वहीद याहू, विनायक सावंत यांच्यासह अन्य नागरीकांच्या स्वाक्ष-या आहेत.


Comments