आमदार मिटकरींवर कडक कारवाई करा, ब्राह्मण ज्ञाती समाजाचे निवेदन

रत्नागिरी आमदार मिटकरी यांनी हिंदू देवता व हिंदू समाजातील पुरोहितांबाबत बेताल व खोटे वक्तव्य करून हिंदू देवतांची बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी रत्नागिरीतील ब्राह्मण ज्ञाती संघटनांनी केली आहे. कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा, अखिल चित्पावन ब्राह्मण सहाय्यक संघ, कऱ्हाडे ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण आणि देवरुखे ब्राह्मण ज्ञाती संघटनांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींकडे आज सुपुर्द केले.
निवेदन दिल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनंत आगाशे म्हणाले की, मागील अनेक पिढ्या ब्राह्मण समाज भारतातील जनतेची विविध माध्यमातून सेवा करत आहे. इतिहासात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये ब्राह्मणांनी योगदान दिले आहे. सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी ब्राह्मणांनी योगदान दिले आहे. परंतु सत्ताधारी राजकीय पक्षांचे नेते, आमदार, हेतुपुरस्सर ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवून बदनामी करत आहेत. ब्राह्मण समाजाचे बहुजन समाजाच्या मनात अवमूल्यन करण्याचा त्यांचा हेतू दिसते. यासाठी हिंदु धर्मातील काही मुलभूत संस्कारांचे विडंबन करून हिंदु धर्माला अवमानीत करत आहेत. यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या आहेत.
चित्पावन ब्राह्मण संघाचे राजन पटवर्धन यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींच्या अशा वक्तव्यांमुळे हिंदु समाजात तेढ निर्माण होत आहे. परंपरागत हिंदु विवाह पद्धतीवर टीका करताना आमदार मिटकरी यांनी हिंदु संस्कारांवर टिका केली. सांगली येथे झालेल्या त्यांच्या भाषणाची क्लिप समाजमाध्यमातून फिरत होती. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी व्हिडिओची तपासणी करून आयोजक व त्यांच्या वक्तव्यास दाद देणाऱ्या शासन प्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई करावी.
हे निवेदन देण्यासाठी अनंत आगाशे, श्री. पटवर्धन यांच्यासमवेत देशस्त ब्राह्मण मंडळाचे रवींद्र इनामदार, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, सौ. तेजा मुळ्ये उपस्थित होते. तसेच पत्रकार परिषदेला कुवारबाव ब्राह्मण सभेच्या उपाध्यक्ष सुरेखा जोशी, किरण देशकुलकर्णी, श्री. हिर्लेकर यांच्यासमवेत दिगंबर घैसास आदी उपस्थित होते.

Comments