रत्नागिरीतील रिक्षाचलकांच्या सीएनजी पुरवठ्याबाबतच्या समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रतिनिधी, पुरवठा अधिकारी, अशोका गॅस एजन्सीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत आयोजीत केली बैठक

रत्नागिरी शहरातील रिक्षाचालकांना सीएनजी गॅस पुरवठ्याबाबत निर्माण होत असलेल्या वेगवेगळ्या समस्यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी. एन पाटील यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी, रत्नागिरी शहरातील काही रिक्षाचालक, अशोका गॅस एजन्सीचे प्रतिनिधी, जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी, पामपेडा संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासमवेत संयुक्त बैठक आयोजित केली होती.
रत्नागिरीतील एमआयडीसी येथे अशोका गॅस एजन्सी च्या वतीने रिक्षाचालकांना तसेच अन्य वाहनचालकांना सीएनजी गॅस दिला जातो. मात्र त्याठिकाणी रिक्षाचालकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळेला गॅस भरत असताना प्रेशर मिळत नाही. त्यामुळे कमी गॅस भरला जातो का असा संशय निर्माण होतो. महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये सीएनजी गॅस दर रत्नागिरी मध्ये मिळणारे सीएनजी गॅस दर यामध्ये खूप मोठी तफावत असून याचा फटका रिक्षाचालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे दरांमध्ये कपात करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. रिक्षाचालकांना सीएनजी गॅस भरत असताना अशोका गॅस एजन्सी च्या कर्मचाऱ्यांकडून योग्य वागणूक मिळत नसल्याची तक्रार या बैठकीत काही रिक्षाचालकांनी मांडली. त्यावर अशोका गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी असे सांगितले की कोणाचीही काहीही तक्रार असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा मात्र रिक्षाचालकांची वागणूक देखील योग्य असावी जर एखादा रिक्षाचालक गॅस भरत असताना गॅस एजन्सी चा कर्मचाऱ्याची योग्यप्रकारे वागत नसेल तर त्यांनी देखील खबरदारी घ्यावी अशीही सूचना सीएनजी गॅस एजन्सी च्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी मांडली. सध्या रिक्षाचालकांना सीएनजी गॅस मिळण्यास विलंब होतो. रांगेत खूप वेळ थांबावे लागते. तेही नुकसान रिक्षाचालकांना सहन करावे लागत आहे. या सर्वांचा विचार अशोका गॅस एजन्सी चा अधिकाऱ्यांनी करावा. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाने देखील रिक्षाचालकांच्या या समस्या संदर्भात सहानुभूती पूर्वक विचार करावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. या बैठकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बशीर मुर्तुझा, कुमार शेट्ये, तालुका अध्यक्ष राजन सुर्वे, शहराध्यक्ष निलेश भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, पेट्रोल पंप संघटनेचे उदय लोध, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.

Comments