हिटलरशाही आणून बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प राबवायचा नाही तर त्यासाठी जनतेचे मत विचारात घेतले जाईल: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पाला त्या भागातील जनतेचा तिव्र विरोध होता. त्यामुळे नाणार मध्ये रिफायनरी प्रकल्प होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मात्र त्यानंतर बारसू ते नाटे परिसरात रिफायनरी प्रकल्प राबवण्यासाठी सर्वेक्षण सुरु झाले. या भागातील काही लोकांचे रिफायनरीसाठी समर्थन आहे तर काही लोकांचा या भागात रिफायनरी प्रकल्प राबवण्याला तिव्र विरोधही आहे. त्यामुळे समर्थन आणि विरोध या दोन्ही गोष्टींचा विचार केला जाईल. परंतू सरकारला हिटलरशाहिचे, हुकुमशाही पद्धतीने प्रकल्प राबवायचा नाही. माझ्या बाबतीत विचारायच झाल तर मी काय धर्मेंद्र प्रधान नाही. प्रकल्पाबाबत जनतेला विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी 31 मार्च रोजी झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा 28, 29 व 30 मार्च रोजी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग दौरा होता. यादरम्यान विरोधकांनी जोरदार टीका केली होती. मात्र आदित्य ठाकरे यांचा दौरा हा कोकणच्या विकासासाठी होता असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग या तिनही जिल्ह्यांना मिळुन पर्यटन विभागाच्यावतीने मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुमारे 188 कोटी 99 लाख 65 हजार एवढ्या निधीला मान्यता दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हातीसचा दर्गा, मुरुड किल्ला, रसाळगड किल्ला यांचा विकास, वेळास पर्यटन स्थळाचा विकास, केळशी दर्गा, कसबा संगमेश्वर छ.संभाजी स्मारकाचा विकास, रत्नागिरीतील तारांगण प्रकल्प, दाभोळ, कालुस्ते बुदृक, आंजर्ले गणपती मंदिर, राजापूर गोडी नदी व अर्जुना नदी संगमावर पर्यटन स्थळ विकासासाठी निधी असा एकूण सुमारे 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यादरम्यान राजापूर येथे दिनांक 29 मार्च रोजी आदित्य ठाकरे यांची रिफायनरी समर्थकांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी रिफायनरी समर्थकांशी सविस्तर चर्चा केली. पुढे मंत्री उदय सामंत यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की रिफायनरी प्रकल्प हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. याबाबत धर्मेंद्र प्रधान निर्णय घेतात. मी काही धर्मेंद्र प्रधान नाही. रिफायनरी संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले असले तरी देखील जनतेला विश्वासात घेऊनच कोणताही निर्णय घेतला जाईल. जनतेला प्रकल्प नको असेल तर प्रकल्प राबवला जाणार नाही. नाणारमध्ये रिफायनरी होणार नाही. बारसू-नाटे या भागात रिफायनारीसाठी आम्हाला काही हिटलरशाही राबवायचही नाही, जनतेचे मत जाणूनच याबाबत विचार केला जाईल अशी प्रतिक्रीया मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. 

Comments