राजापूरात 2021 मध्ये झालेल्या भात शेती नुकसानीच्या नुकसान भरपाईचे वाटप कधी होणार? आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घ्यावा आढावा

राजापूर तालुक्यातील अर्जुना नदिकिना-यानजिक असलेल्या धोपेश्वर, पन्हळे, गोवळ, शिवणे खुर्द, देवाचे गोठणे या गावांमध्ये गेल्या वर्षी म्हणजेच जुलै 2021 ते ऑगस्ट 2021 या काळात मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे अर्जुना नदीला आलेल्या उधाणामुळे तब्बल 15 दिवस शेतात पाणी घुसले होते. त्यामुळे भात शेतीचे शंभर टक्के नुकसान झाले. या नुकसानीची नुकसान भरपाई शेतक-यांना अद्याप मिळालेली नाही. याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राज्य सरकारने शेती नुकसानीसाठी करोडो रुपये नुकसान भरपाइची घोषणा केली. मात्र राजापूर तालुक्यातील शेतक-यांपर्यंत नुकसान भरपाई प्रत्यक्ष किती पोचली हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील नुकसान भरपाई वाटपाबाबत राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आढावा घेण्याची आवश्यकता आहे. 
2021 मध्ये राजापूर तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे अर्जुना नदिपात्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. शिवाय या नदिपात्रातील गाळ उपसा करण्यात आलेला नाही. त्यामुळे भात शेतीचे शंभर टक्के नुकसान झाले. 2021 मध्ये चिपळूण मध्ये वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने तेथील घरे, दुकाने वाहून गेली. त्यावर उपाय म्हणून वाशिष्ठी नदीपात्रातील गाळ उपसा व्हावा अशी मागणी तेथील नागरीकांनी केली. त्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या वाशिष्ठी नदिपात्रातील गाळ उपसा करण्यास मान्यता देण्यात आली. सध्या वाशिष्ठी नदिपात्रातील गाळ उपसा सुरु आहे.
मात्र तशीच परिस्थिती राजापूरातील अर्जुना नदीकिनारी असलेल्या गावांची झाली होती. तिथे घरे नाही तर शेती वाहून गेली. मात्र या शेतीच्या नुकसानीबाबत फारसा कुणी आवाज उठवला नाही. परिणाम म्हणून शेतक-यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत राजापूर तहसिल कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहीती नागरिकांना देण्यात आलेली नाही. ज्या लोकाना नुकसान भरपाई दिली असेल त्यांची यादी तहसिल कार्यालयाने प्रसिद्ध करणे गरजेचे होते. मात्र तहसिल कार्यालयाने तसे केलेले नाही. त्यामुळे शेतक-यांना काहिच माहीती मिळाली नाही. 
राजापूर तालुक्यात 2021 मध्ये राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाहणी दौरा केला होता. त्यावेळी राजापूर तालुक्यातील घरांची जिथे जिथे नुकसान झाले त्या भागाची पाहणी केली व प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही केल्या. मात्र तहसिल प्रशासनाकडून सूचनांचे पालन झालेले दिसून येत नाही. अजुनही ब-याच लोकांना घरांच्या नुकसानीचीही भरपाई मिळालेली नाही. अजुनही लोक नुकसान भरपाइच्या प्रतिक्षेत आहेत. अजुनही काही भागातील तलाठ्यांनी आपले अहवाल तहसिल कार्यालयापर्यंत पोचवलेच नसल्याची माहीती मिळत आहे. 
एकुणच काय राजापूरचे शेतकरी 2021 च्या नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहिले असून लोकप्रतिनिधी आवाज उठवताना दिसून येत नाहित. त्यामुळे राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजापूर तहसिल कार्यालयाचा आढावा घ्यावा व सामान्य शेतक-यांना न्याय मिळवून द्यावा अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. 

Comments