राजापूर ग्रामीण रुग्णालय येथे बुधवारी 20 एप्रिल रोजी तालुकास्तरीय भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर ग्रामीण रुग्णालय येथे बुधवार दिनांक 20 एप्रिल रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी दोन या वेळेत तालुकास्तरीय भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्या संदर्भात बुधवार दिनांक 13 एप्रिल रोजी आरोग्य मेळावा नियोजन समितीचे सहअध्यक्ष गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कमळे, राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री, महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी सौ. लिगम आदी उपस्थित होते. यामध्ये तालुकास्तरीय आरोग्य मेळाव्याचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राम मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर ग्रामीण रुग्णालयातील सर्व विभागांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक पार पडली व सदर मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. सदर मेळाव्यामध्ये जनरल सर्जरी जनरल मेडिसिन, बालरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, दंतचिकित्सक, नेत्ररोग तज्ञ आदी उपस्थित राहणार असून सदर आजारांच्या संदर्भात रुग्णांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. या मेळाव्या दरम्यान रक्त लघवी तपासणी देखील मोफत करण्यात येणार आहेत. पात्र नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड मिळवून देण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे युनिक हेल्थ आयडी कार्ड मिळवून देण्यासाठी देखील मदत करण्यात येणार आहे. तर यातून निवड झालेली पात्र लाभार्थी यांचे ऑपरेशन करावयाचे आहे त्यांचे मोफत ऑपरेशन रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय व रामनाथ हॉस्पिटल रत्नागिरी याठिकाणी करण्यात येतील. सदर शिबिराला उपस्थित राहणाऱ्या सर्व रुग्णांसाठी अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राम मेस्त्री कामगिरी बजावत आहेत.

Comments