भारतासाठी रशिया ६ तास युद्ध रोखण्यास तयार?

खारकीव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सैन्याने मानवी ढाल बनवल्याच्या आरोप रशियाने केला होता. यादरम्यान भारतातील जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. खारकीव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी रशियाने ६ तास युद्ध थांबवण्याचे मान्य केले आहे. तिथे अडकलेल्या भारतीयांना खारकीव्हपासून युक्रेनच्या आजूबाजूच्या देशांच्या सीमेवर सुरक्षितपणे नेण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सोशल मीडियावरील काही ट्विटमधून हा दावा करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींचा पुतीन यांच्याशी संवाद

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी बुधवारी रात्री चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याचा मुद्दा उपस्थित केला. रशिया सर्व शक्य मदत करण्यास तयार आहे, असे रशियाच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींना सांगितले होते. खारकीव्हमध्ये युक्रेनचे सैन्य भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर करत आहेत, असा आरोपही रशियाने केला होता.

⏺️पुतिन यांनी विश्वास दिला होता
पीएम मोदींसोबतच्या संभाषणादरम्यान व्लादिमीर पुतिन यांनी भारताला आश्वासन दिले होते. भारतीय विद्यार्थ्यांना युद्धक्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना भारतात पाठवण्यासाठी सर्व आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. रशियन सैन्य या दिशेने सर्वतोपरी प्रयत्न करेल. भारतीय विद्यार्थ्यांच्या तात्काळ सुटकेसाठी रशियन सैन्याकडून खारकीव्ह ते रशियापर्यंत सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्याबाबतही पुतीन बोलले. यानंतर दुसऱ्याच दिवशी रशियाने ६ तास युद्ध थांबवण्याचे मान्य केले आहे, असा दावा करण्यात येत आहे.

⏺️अजूनही अनेक विद्यार्थी खारकीव्हमध्ये अडकले
युक्रेनच्या खारकीव्ह शहरात अजूनही शेकडो भारतीय विद्यार्थी अडकून असल्याची माहिती आहे. भारतीयांना बाहेर पडू दिले जात नसल्याचे सांगण्यात आले. रेल्वेमध्येही चढू दिले जात नसल्याचे फोटो समोर आले आहेत.

Comments