राजापूर शहरातील अर्जुना नदी व गोडी नदी संगम येथील पर्यटन स्थळ व रानतळे पिकनिक स्पॉट विकसित करण्यासाठी निधी प्राप्त, माजी आमदार हुस्नबानू खलिफे व माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांचे विशेष प्रयत्न

राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी राजापूर शहरातील दोन विकास कामांसाठी निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सरचिटणीस व माजी विधान परिषद आमदार अॅड.हुस्नबानू खलिफे व राजापूरचे नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राजापूर शहरातील अर्जुना नदी व गोडी नदी संगम ठिकाणचे पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी सुमारे 24 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच शहरातील आणि रत्नागिरी-पावसमार्गे-राजापूर सागरी महामार्गानजिक असलेल्या परंतू राजापूर नगर परिषद हद्दीतील रानतळे येथील पिकनिक स्पॉटच्या विकासासाठीही सुमारे 22 लाख 95 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सरचिटणीस व माजी विधान परिषद आमदार अॅड.हुस्नबानू खलिफे यांनी तसेच नगराध्यक्ष पदावर असताना अॅड.जमीर खलिफे यांनी राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे या दोन विकास कामांसाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. त्यानंतर अॅड.हुस्नबानू खलिफे व अॅड.जमीर खलिफे यांनी सदर विकास कामांना मान्यता मिळण्यासाठी मंत्रालयात जाऊन सतत पाठपुरावाही केला. आता या विकास कामांना निधी प्राप्त झाला असून सदर विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. सदरची दोन विकास कामे मंजूर झाल्याबद्दल राजापूर शहरवासियांमधून राज्यमंत्री आदिती तटकरे, माजी विधान परिषद आमदार अॅड.हुस्नबानू खलिफे व माजी नगराध्यक्ष अॅड.जमीर खलिफे यांचे आभार मानण्यात येत आहेत.

Comments