सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी यांची नेमणूक करुन आम्हाला न्याय मिळवून द्यावा: देवाचे गोठणे सोगमवाडी येथील सदानंद तानाजी झिंबरे यांचे मुख्यमंत्र्यांच्या दालनात निवेदन सादर
सामजिक बहिष्काराअंतर्गत न्याय मिळवून द्यावा अशी मागणी राजापूरातील देवाचे गोठणे सोगमवाडी येथील सदानंद तानाजी झिंबरे व अन्य यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात असे म्हटले आहे की सदानंद तानाजी झिंबरे, जयदास आत्माराम झिंबरे, आणि समस्त झिंबरे भावकी हे अर्जदार आहेत. अर्जदार हे मु.पो.देवाचे गोठणे - सोगमवाडी, ता. राजापूर, जि.रत्नागिरी महाराष्ट्र येथील ग्रामस्थ असून सोगमवाडीचे वाडीप्रमुख व देवाचे गोठणे गावाचे गावप्रमुख म्हणून मागील अनेक वर्षे काम करीत आहेत. पुढे निवेदनात म्हटले आहे की- मी माझे मयत चुलते कै . उमाजी विश्राम झिंबरे यांचे अंतिम धार्मिक विधी तेरावे व चौदावे विधी करून केल्यामुळे सदर गावकार बंधूनी व सोगम गावकीने मिळून मला व माझ्या समस्त झिंबरे भावकीला माहे जानेवारी २०२१ मध्ये सामाजिक बंधने लादून समाजातून बहिष्कृत केलेले आहे . त्याबद्दलचे प्रकरण व तक्रार अर्ज मा . जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे न्यायासाठी प्रलम्बित आहे . आमचा सामाजिक बहिष्काराचा तक्रार अर्ज पुढील कार्यवाहीसाठी मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी मा . प्रांत अधिकारी राजापूर यांच्याकडे न्यायोचित कारवाईसाठी वर्ग केलेला असून सदर अर्ज मा.प्रांत अधिकारी राजापूर यांच्याकडे प्रलंबित असून आम्हाला अजून कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही. सदर अर्जासोबत आमचा सामाजिक बहिष्कार तक्रार अर्ज जोडत आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी यांच्या महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण ( प्रतिबंध , बंदी व निवारण ) अधिनियम २०१६ मधील विविध कलमांनुसार गुन्हा रजि . नं . ११८/२०२१ नोंद केलेला असून सदर प्रकरण मा. कनिष्ट न्यायालय राजापूर या ठिकाणी प्रलंबित आहे. सदर अर्जासोबत गुन्हा रजि. नं . ११८/२०२१ ची झेरॉक्स प्रत जोडत आहे . आम्ही आमच्या सामाजिक बहिष्काराच्या प्रकरणाची चौकशी सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी यांच्या मार्फत करावी यासाठी जिल्हाधिकारी रत्नागिरी व प्रांत अधिकारी राजापूर यांच्याकडे केली असता अजून सदर प्रकरणात सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्हाला न्याय मिळविताना भरपूर अडचणी येत असून सदर पत्र आपणास मिळताच ताबडतोब तीस दिवसांच्या आतमध्ये आपण सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी यांची नेमणूक करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हि नम्र विनंती. अशा आशयाचे निवेदन सोगमवाडी येथील सदानंद तानाजी झिंबरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले असून मंत्रालयात सादर केले आहे.
Comments
Post a Comment