रत्नागिरीत कातळशिल्प महोत्सव? ग्रामीण जनतेला काय फायदा?

दिनांक 26 आणि 27 मार्च रोजी रत्नागिरीतील थिबा पॅलेस येथे कातळशिल्प महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. कदाचीत या महोत्सवासाठी शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्चिही होत असेल. मात्र या महोत्सवाचा रत्नागिरी जिल्हावासियांना खरच काही लाभ होणार आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये काही गावांमध्ये कातळशिल्प आढळून आली आहेत. त्याचा शोध घेणा-यांना खरच खूप धन्यवाद मानायला पाहिजेत. मात्र कातळशिल्पांचा शोध लागल्यानंतर शासन स्तरावरुन आत्ता पर्यंत नेमके किती प्रयत्न झालेत? उदाहरणार्थ राजापूर तालुक्यात बारसू, देवाचे गोठणे या भागात कातळशिल्प आढळून आली आहेत. मात्र किती स्थानिक जनतेला ही कातळशिल्पे दाखवण्यात आलीत? बारसू पासून नाटे गावापर्यंत अनेक प्राथमिक शाळा आहेत, माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यातील किती विद्यार्थ्यांना शासनाचा एक उपक्रम म्हणून कातळशिल्पे दाखवण्यात आलीत? रत्नागिरी जिल्ह्यात अनेक विज्ञान प्रदर्शने आयोजीत करण्यात येतात. त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा निधीही खर्ची होतो. मात्र कातळशिल्प संशोधन व विकासासंदर्भात शिक्षण खात्याने प्रयत्न केलेत? कातळशिल्प महोत्सव अशा ठिकाणी आवश्यक आहे ज्या ठिकाणी कातळशिल्प आहेत आणि लोकांना त्याची माहीती मिळणे गरजेचे आहे. रत्नागिरी शहरात कातळशिल्प महोत्सव आयोजीत करुन लोकांना प्रत्यक्ष कातळशिल्प कशी असतात ते कळणार कसे? शिवाय कातळशिल्प कोणत्या गावात आहेत हे देखील कळणार कसे? आत्तापर्यंत जिल्ह्यातील ज्या कातळशिल्पांचा शोध लागला त्या ठिकाणी किती पर्यटकांनी भेट दिली याची आकडेवारी शासनाकडे आहे का? कातळशिल्प संशोधनातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती किती झाली याची आकडेवारी आहे का? आणि जिल्ह्यातील किती शालेय विद्यार्थ्यांना गावागावात जाऊन शासनाच्या उपक्रमातून कातळशिल्प दाखवण्यात आली याची आकडेवारी आहे का? असे असंख्य सवाल उपस्थीत होत आहेत. 

Comments