12 ते 14 वयोगटासाठी लसिकरणाला प्रारंभ: जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी संपुर्ण लसीकरण मोहिमेचा घेतला आढावा

रत्नागिरी जिल्हयातील आरोग्य विभागाकडून १२ ते १४ योगटातील मुला-मुलींसाठी लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीव्दारे संपूर्ण जिल्हयात होणाऱ्या लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.  जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या संपूर्ण लसीकरण मोहिम यशस्वी केल्याबद्दल सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले. तसेच पुढील लक्ष्य साधण्यासाठी सुचनांसह शुभेच्छा दिल्या. 

यावेळी दूरदृष्य प्रणालीव्दारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, तालूका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

कोविड लसीकरणाच्या आठव्या टप्प्यात रत्नगिरी जिल्ह्यात १२ ते १४ वयोगटातील ३२ हजार १४५ मुलं तर ३० हजार ९०२ मुली अशा एकूण ६३ हजार ४७ मुला-मुलींना  कोरबेवॅक्सचे लसीकरण करण्यात येत आहे. १५ मार्च २०१० पुर्वी जन्मलेली मुले या लसीकरणासाठी पत्र ठरतील. या मुलांना कोरबेवॅक्स लसीचे दोन डोस देण्यात येणार असून दोन डोस मधील अंतर चार आठवडे इतके राहणार आहे. सध्या बहूतांश शाळांमध्ये परिक्षा सुरु आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी परिक्षा संपल्या बरोबर मुलांच्या लसीकरणाचे काम पूर्ण करावे.  त्यासाठी शिक्षण विभागाने  शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी.  लसीकरणाचे प्रमाण वाढवावे अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 

२००७ वा त्यापूर्वी जन्मलेले १५ ते १८ वयोगटातील ७१ हजार ७४४ लाभार्थी असून त्यापैकी ४९ हजार ३६२ लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांचे प्रमाण ६८.८० टक्के आहे. ३४ हजार ६८९ लाभार्थ्यांनी दूसरा डोस घेतला असून त्याचे प्रमाण ४८.35 टक्के आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत १८ वर्षावरील एकूण १९ लाख ३२ हजार ६३ नागरीकांचे लसीकरण झाले असून १० लाख ५३ हजार ७६० नागरिकांना पहिला डोस देण्यात आला याचे प्रमाण ९७.४० टक्के तर ८ लाख ७८ हजार ३०३ नागरीकांनी दूसार डोस देण्यात आला याचे प्रमाण ८१.१८ टक्के आहे. 

सर्व तालुक्यामध्ये खबरदारी (Precaution) डोस घेण्याऱ्यांची संख्या वाढली आहे.  जिल्हयात एकूण २० हजार ४०९ नागरीकांनी  खबरदारी (Precaution) डोस घेतला आहे.

इतर देशांमध्ये चौथ्या लाटेची सुरुवात झाली असून, त्या अनुषंगाने सर्वत्र काळजी घेणे आवश्यक आहे. निर्बंध शिथिल झाल्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी केले.

Comments