ED कडून सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव…

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हावी या हेतूने महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी काही लोकांनी माझी भेट घेतली होती. परंतु त्यांना मदत करण्यास नकार दिल्यानंतर अंमलबजावणी संचलनालय ने माझ्यासह माझ्या कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे.
ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी हे आता काही राजकीय नेत्यांच्या इशार्‍यावर काम करत आहेत, असा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवून केला आहे. शिवाय हे पत्र माहितीसाठी असून ट्रेलर अजून बाकी आहे. ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेऊन धमाका करणार, असेही राऊतांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन या पत्रासंबंधीची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, काही लोकांनी मला भेटून राज्यातील सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणुका घेता येतील, यासाठी दबाव टाकला. त्याला नकार दिल्यावर माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांना देखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली.

संजय राऊत यांनी पत्रात म्हटले की, अलिबागमध्ये 17 वर्षांपूर्वी 1 एकर जमीन खरेदी केली होती. ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली, त्यांच्या कुटुंबीयांना ईडीकडून  त्रास दिला जात आहे. जमीन व्यवहारासाठी कागदपत्रांत नमूद असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम मिळाल्याची कबुली देण्यासाठी ईडीकडून त्यांना धमकी दिली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

गेल्या वर्षी मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी असलेले डेकोरेटर्स आणि इतर विक्रेत्यांना 50 लाख रोख मिळाल्याचा जबाब घेण्यासाठी फोन करून धमकावत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आमच्या पक्षाचे आमदार, खासदार, राजकीय नेते तसेच त्यांचे नातेवाईक, मित्र आणि परिचित यांना धमकावण्यास आणि त्यांचा छळ करण्यात येत असल्याचाही आरोप राऊत यांनी केला आहे.

२९ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्या मुलीचे लग्न झाल्यानंतर ईडी आणि अन्य तपास यंत्रणांनी लग्नासाठी सेवा पुरवणारे डेकोरेटर्स आणि इतर व्यावसायिकांना चौकशीसाठी बोलावून घेतले आणि संजय राऊत यांनी तुम्हाला लग्नाच्यावेळी ५० लाख रुपये रोख दिले, असा जबाब देण्यासाठी संबंधित व्यावसायिकांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. त्याला नकार दिल्यावर ईडी आणि अन्य यंत्रणांच्या अधिकार्‍यांकडून या सर्वांना सातत्याने त्रास दिला जात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

‘मुंबईचा दादा शिवसेना’
महाराष्ट्राच्या नेत्यांना अडकवण्यासाठी, तुरुंगात डांबण्यासाठी ईडी काम करत आहे. अशा एजन्सीच्या अधिकार्‍यांविरोधात आम्ही एफआयआर दाखल करणार आहोत. ईडीचे अधिकारी वसुलीचे काम करतात. त्यांचे एजंट बाहेर फिरतात. मुंबई पोलिसांनी ईडीची चौकशी करावी. ईडीचा नकाब उतरवल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत दादागिरी चालणार नाही. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, असे राऊतांनी म्हटले.

सिंह कधी गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही
संजय राऊत हे व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सिंह कधी गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आरोपांना बुधवारी प्रत्युत्तर दिले.

Comments