राजकीय वरदहस्तामुळेच शासकीय विश्रामगृहात गैरप्रकार - अनिकेत पटवर्धन
*रत्नागिरी* : शहरातील माळनाका येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील शासकीय विश्रामगृह नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दारुच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिक कचरा आणि राजकीय वरदहस्तामुळे कर्मचारी चुकीच्या पद्धतीने वागतात. याकडे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहावे. शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार देऊन अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले.
शासकीय विश्रामगृहातील या साऱ्या गैरप्रकारांबाबत सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे आणि शाखा अभियंता जनक धोत्रेकर, कार्यकारी अभियंता पुजारी मॅडम यांची चौकशी अधीक्षक छाया नाईक यांनी दोन दिवसांत करावी आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी पटवर्धन यांनी केली आहे.
शासकीय विश्रामगृहाचा गैरवापर करत असल्याबाबत यापूर्वी अनेकवेळा अहवाल सादर झाले. परंतु त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु राजकीय वरदहस्तामुळे यापैकी तक्रारी उजेडातच येत नाही. याबाबत अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेण्याची गरज आहे. राजकीय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे करू नये, अशा सूचना असूनही येथे असे प्रकार घडल्याचे माहिती कळतेय. त्यामुळे येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज घेऊन अधिकाऱ्यांनी पाहणी करावी. याची माहिती करून घ्यावी आणि असे प्रकार घडले त्याला कोण जबाबदार हे जाहीर करावे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे. शासकीय विश्रामगृहातील अनेक गैरप्रकारांना खतपाणी घातले जात आहे, असा आरोप अनिकेत पटवर्धन यांनी केला आहे.
यासंदर्भात त्यांनी सांगितले की येत्या ३ मार्च २०२२ ला अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे शासकीय विश्रामगृहातील गैरप्रकारांबाबत तक्रार देणार आहोत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तक्रार देऊन त्याचा पाठपुरावा करू. या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेसुद्धा लक्ष ठेवून आहेत.
कोणतेही शासकीय रेकॉर्ड दाखवले जात नाही. परंतु एका व्हिडिओमध्ये शासकीय विश्रामगृहात कोण कोण आले, त्यांच्या पावत्या दाखवण्यात आल्या आहेत. हे शासकीय रेकॉर्ड दाखवण्याची परवानगी नसतानाही ते दाखवण्यात आले आहे. कोणतेही शासकीय दस्तावेज अशा रितीने दाखवले जात नाहीत. तसेच आपले दफ्तर हाती वापरायला देण्यात आल्याचे व्हिडिओत दिसत आहे, सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात शासकीय विश्रामगृहातील दुरवस्था, प्लास्टिक कचरा, दारुच्या बाटल्या यांचा भांडाफोड करण्यात आहे.
Comments
Post a Comment