राज्यव्यापी लाक्षणिक संपाबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची सभा संपन्न
राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांनी दि. २३ फेब्रुवारी व २४ फेब्रुवारी असे दोन दिवस राज्यव्यापी लाक्षणिक संप आंदोलनाची नोटीस शासनाला दिलेली आहे. सदर दोन दिवसांच्या राज्यव्यापी लाक्षणिक संपाबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची सभा बुधवार दि.१६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.
सदर सभेला जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वामन कदम, समीर इंदुलकर, संजय कांबळे, संजय नलावडे, जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेचे राजेंद्र जाधव, नितीन तांबे, जिल्हा परिषद वाहनचालक संघटनेचे सुनिल गुरव, श्री. वरक, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे शैलेश आंबेरकर, महेश वरक, श्रीम. विरश्री बेटकर, अभय लाड, जिल्हा परिषद परीचर संघटनेचे रविंद्र होतेकर, रमेश सावंत, आरेखक संघटनेचे सुनिल कांबळे, जिल्हा परिषद औषधनिर्माता संघटनेचे धनंजय जाधव, दि. 01/11/2005 नंतर सेवेत प्रविष्ट झालेले नवीन पेन्शन योजना संघटनेचे प्रतिनिधी दिनेश सिनकर, उमेश कोलगे इत्यादी तसेच सर्व संवर्गांमधील कर्मचारी उपस्थित होते.
सदर सभेमध्ये राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांनी दि. 23/02 व 24/02/2022 असे दोन दिवस राज्यव्यापी लाक्षणिक संपाबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत सर्व संघटना प्रतिनिधींनी आपले मत व्यक्त केले.
राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेमार्फत दिलेल्या निवेदनासोबत दिलेल्या मागण्यांच्या सनदीमधील मागण्या हया रास्त असल्याने सदर दोन दिवसांच्या लाक्षणिक संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला.
यानंतर संध्याकाळी सदर संपाबाबत प्रचार करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व विभागांमध्ये तसेच पंचायत समिती रत्नागिरी येथे प्रचार फेरी काढण्यात आली व सदर संपामध्ये सर्वच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हास्तरावरील तसेच तालुकास्तरावरील सर्व जिल्हा परिषद कर्मचारी सदर संपामध्ये सहभागी होणार असून सर्वांनी मिळून सदर दोन दिवसांचा लाक्षणिक संप यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment