राजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्गाच्या काँक्रीटीकरणाच्या कामात खोकेधारकांचा प्रश्न माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांच्या मध्यस्थीने सुटला; खोकेधारकांनी खोके हटविण्यास सहमती दर्शविली
राजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून या रस्त्याच्या कडेला असलेले व्यापारी खोके संबंधितांनी न हटविल्याने रस्त्याच्या कामाला अडसर निर्माण झाला होता. अखेर माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांनी खोकेधारकांची बैठक घेत सामंज्यस्याने या अडचणीवर तोडगा काढला आहे. त्यामुळे खोकेधारकांनीही खोके हटविण्यास सहमती दर्शविली आहे. शहरातील जवाहर चौक ते कोंढेतड पुलापर्यंत असलेल्या छ.शिवाजी महाराज मार्गाचे सुमारे दिड कोटी रूपये खर्चुन काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच या कामाला सुरूवात झाली आहे. या रस्त्याच्या एका कडेला छोटे-छोटे व्यापारी खोके आहेत. ते तात्पूरते हटवून पूर्ण रस्ता काँकीटीकरण करण्यात येणार आहे. मात्र रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर खोकेधारकांच्या काही मागण्या असल्याने त्यांनी खोके हटविले नव्हते. त्यामुळे रस्त्याच्या कामाला अडसर निर्माण झाला होता. ही बाब माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांना समजल्यानंतर त्यांनी बुधवारी सर्व खोकेधारकांची बैठक घेऊन तसेच प्रत्यक्ष पाहणी करून या समस्येवर तोडगा काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मार्गाचे काम दर्जेदार व्हावे, तसेच शहर स्वच्छ व सुंदर दिसावे याकरीता रस्त्यालगतचे खोके हटवून त्याखाली काँक्रीटीकरण होणे गरजेचे आहे, ही बाब ॲड.खलिफे सर्व खोकेधारकांना पटवून दिली. तसेच या कामात खोकेधारक व सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच रस्त्याच्या कामानंतर कोणत्याही खोकेधारकावर गदा येणार नाही. काम पूर्ण होताच खोके पुन्हा त्या-त्या जागेवर बसविण्यात येतील अशी ग्वाही दिली. त्यामुळे खोकेधारकांनी खोके बुधवारपासून हटविण्यास सुरूवात केली आहे. खोकेधारकांना खोके हटविण्यासाठी नगरपरिषद सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन नगरपरिषदेचे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव यांनी दिले. या बैठकीला माजी नगरसेवक व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, शिवसेनेचे माजी नगरसेवक विनय गुरव, नगर परिषद अभियंता जाधव आदींसह व्यापारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment