रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांसाठी आयोजीत कायदेशीर साक्षरता शिबिर उत्साहात संपन्न
रत्नागिरी विशेष कारागृहातील कैद्यांसाठी कायदेशीर साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, आनंद सामंत आणि जिल्हा विधी सेवा पॅनल विधीज्ञ अॅड. अमित शिरगांवकर यांनी कैद्यांना कायदेविषयक आणि विधी सेवांविषयक मार्गदर्शन केले. कायदेशीर जागृती अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विधी सेवा प्राधिकरणाची पार्श्वभूमी, विधी सेवा प्राधिकरण तर्फे आरोपींच्या अधिकारांचे संरक्षण, कैद्यांच्या आरोग्यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या इतर सुविधा, याबाबत माहिती देण्यात आली. तसेच कैद्यांचा न्यायालयासमोर जामीन अर्ज दाखल करणे, न्यायालयाला जामीनाबाबत शिफारस करणे, न्यायालयातील प्रकरण चालविणे, अपील सादर करणे याबाबत विधी सेवा प्राधिकरणाच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. विधी सेवा पॅनल विधीज्ञ अॅड. अमित शिरगांवकर यांनी शिबिराचे महत्त्व, कायदेविषयक मदतीसाठी नियुक्त केलेल्या पॅनेल वकिलांकडून कैद्यांच्या बैठका, आणि कारागृहात नियुक्त केलेल्या पॅरालीगल स्वयंसेवकांद्वारे कैद्यांचे दैनंदिन समुपदेशन केले जाते याविषयी माहिती दिली. कैद्यांचे हक्क, अधिकार, कैद्यांना कायदेशीर मदत प्रक्रिया व कैद्यांच्या जामीनाबाबत अथवा अंतरिम जामीन प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. शिबिरात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आनंद सामंत यांनी कैद्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. विधी सेवा प्राधिकरणतर्फे देण्यात येणारे विधीज्ञ यांचा खर्च त्यामध्ये टंकलेखन, मसुदा तयार करणे, न्यायालयीन कामकाज चालविल्याचा खर्च हा नियमानुसार विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत प्रदान केला जातो. त्यामुळे विधी सेवा ही पक्षकारांसाठी माेफत असली तरी संबंधीत विधीज्ञांना त्यांचे मानधन विधी सेवा प्राधिकरण देत असते. त्याचप्रमाणे विधी सेवा देणारे विधीज्ञ हे सरकारी वकील असल्याचा ब-याच लोकांचा गैरसमज असतो. परंतु बॅकेच्या अथवा इतर संस्थांच्या पॅनलवर जसे विधीज्ञ नियुक्त केले जातात तसेच सक्षम विधीज्ञ विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनलवर नियुक्त केलेले असतात. विधी सेवेबददल सचिव यांनी उपस्थीतांना सविस्तर माहिती दिली. शेवटी आभार प्रदर्शन कारागृह उप अधीक्षक श्री. अमेय पोतदार यांनी केले. कारागृह अधीक्षक आर.एस.चांदणे, आदींच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी विशेष कारागृह याठिकाणी शिबिराचे नियोजन आणि आयोजन केले होते.
Comments
Post a Comment