ठाकरे सरकार वाईन विक्रीबाबतचा निर्णय मागे घेणार?
ठाकरे सरकार वाईन विक्रीबाबतचा निर्णय मागे घेणार? शरद पवार यांचं सूचक वक्तव्य
मुंबई:
राज्यातील सुपरमार्केटसमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून मागे घेतला जाऊ शकतो. महाविकासआघाडीचे शिल्पकार आणि मार्गदर्शक शरद पवार यांनी तसे संकेत दिले आहेत. एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी वाईनबाबतच्या निर्णयावर भाष्य केले. हा विषय इतका चिंताजनक आहे, असे मला वाटत नाही. पण काही राजकारण्यांना वेगळं वाटत असेल तर त्याच्यावर राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्वीकारल्यास त्यामध्ये फार वावगं वाटणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. त्यामुळे आता महाविकासआघाडी सरकार सुपरमार्केटसमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय मागे घेईल, अशी चर्चा रंगू लागली आहे.
⏺️किराणा दुकान, मॉलमध्ये वाइन नकोच!
सध्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये सर्वाधिक १८ वायनरीज आहेत. गेल्या २० वर्षांपासून नाशिकमध्ये वायनरीज आहेत. इतक्या वायनरीज नाशिकमध्ये सुरु आहेत, याचा अर्थ तेथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होतो. वाईन आणि लिकरमधील फरक ओळखण्याची भूमिका घेतली पाहिजे. पण तशी भूमिका घेण्यात आली नाही. या निर्णयाला विरोध असेल तर राज्य सरकारने या गोष्टींबाबात वेगळा निर्णय घेतला तरी त्याला माझा विरोध असण्याचे कारण नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. त्यामुळे आता ठाकरे सरकार आपला निर्णय मागे घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गेल्या आठवड्यात झालेल्या ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सुपरमार्केटसमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावा महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केला होता. तर भाजपच्या नेत्यांनी या निर्णयामुळे महाराष्ट्र म्हणजे मद्यराष्ट्र झाल्याची टीका भाजपच्या नेत्यांनी केली होती.
Comments
Post a Comment