रत्नागिरीत २५ जानेवारीला ग्रामीण व समुदाय आधारित पर्यटन परिषद*
*रत्नागिरीत २५ जानेवारीला ग्रामीण व समुदाय आधारित पर्यटन परिषद*
*रत्नागिरी* : जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने ग्रामीण पर्यटन व समुदाय आधारित पर्यटन या विषयावर सलग चौथ्या वर्षी पर्यटन परिषद आयोजित केली आहे. येत्या २५ जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत सभागृहात दिवसभर परिषद होणार आहे. कोरोनाचे नियम पाळून परिषद होईल, तसेच फेसबुक, यु ट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.
भाटलेकर यांनी सांगितले की, रत्नागिरीच्या शाश्वत पर्यटन विकासासाठी संस्था कार्यरत आहे. पर्यटन संचालनालय (कोकण विभाग, नवी मुंबई) यांच्या सहकार्याने २५ जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिनाचे औचित्य साधून चौथी रत्नागिरी जिल्हा शाश्वत पर्यटन परिषद होणार आहे. तीन पर्यटन परिषदा व एक जागतिक पर्यटन दिन साजरा केल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन परिषदेमुळे चांगले दिवस येऊ लागले आहेत. अनेक देशविदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात रत्नागिरीत वळू लागले आहेत. यामध्ये इतर अनेक प्रशिक्षण कार्यक्रम प्रामुख्याने टुरिस्ट गाईड प्रोग्राम केल्यामुळे अनेक तरुण सध्या गाईडचे काम करू लागले आहेत.
पर्यटन विकास व्हावा व स्थानिक स्तरावर व शासन स्तरावर वेगवेगळ्या सोयीसुविधेसाठी पर्यटन परिषदेतून मागण्या करण्यात येतात. तालुक्यातून येणाऱ्या मागण्या जिल्हा स्तरावरून मंत्रालय स्तरावर जाऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येतो. अनेक सोयीसुविधा जिल्हयामध्ये आता निर्माण होत आहेत. शासनही पर्यटन विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवित आहेत.
या परिषदेस उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, माजी खासदार निलेश राणे, पर्यटन संचालनालयाचे कोकण प्रमुख हणमंत हेडे, माजी आमदार बाळासाहेब माने व हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, उद्योजक शाळीग्राम खातू, संजय यादवराव, डॉ. श्रीधर ठाकुर, रमेश कीर, सुधीर पाटील, आमदार, खासदार व इतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचे निर्बंधामुळे ही परिषद मोजक्याच पर्यटक प्रेमींच्या उपस्थितीत होईल.
Comments
Post a Comment