मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड येथे नववर्षाचे स्वागत उत्साहात

संगमेश्वर- तालुक्यातील यशवंत शिक्षण संस्था संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड या विद्यालयात नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. यावेळी विविध उपक्रमांची रेलचेल पहावयास मिळाली. विद्यार्थ्यांनी शाळेची स्वच्छता आणि सजावट केली. मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांंना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नवीन वर्षात नवीन संकल्प करण्याचे आणि पुढील वर्षभर त्यांचे कसोशीने पालन करण्याचे आवाहन यावेळी मुख्याध्यापकांनी केले.
          या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या माखजन येथील प्रसिध्द ब्युटीशिअन सौ. सलोनीताई बाष्टे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. आकर्षक वेषभूषा आणि उत्तम संवाद यांचा सुरेख मिलाफ पहावयास मिळाला. सर्वच स्पर्धकांनी उपस्थित परीक्षकांना, पालकांना व शिक्षकांना मुग्ध करून टाकले. अंती परीक्षकांनी मान्य केले की स्पर्धेत विजेत्यांची निवड करण्यासाठी फारच काटेकोरपणे निकष लावावे लागले. सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना वेषभूषेसंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
          या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या स्पर्धा विभागाने कु. नमिरा शेकासन यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यानंतर शाळेच्या उपमुख्याध्यापिका सौ. सिमी खोत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित मान्यवरांना धन्यवाद देत मुख्याध्यापकांच्या संमतीने कार्यक्रमाचा समारोप केला. संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण सहाय्यक शिक्षिका सौ. मयुरी करंजेकर यांनी केले. तर वृत्तांकन श्री ओंकार मोहिते यांनी केले.

Comments