चिपळूणात विनापरवाना वाळूसाठा जप्त:महसूल विभागाची धडक कारवाई
चिपळूण -
गोवळकोट धक्का येथील कालुस्ते पुलाखाली सुमारे ३५ ब्रास विनापरवाना वाळू साठा जप्त करण्यात आला. येथील महसूल विभागाच्या भरारी पथकाने गुरूवारी रात्री १० वाजता ही कारवाई केली. या कारवाईत अडीच लाख किमतीचा वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेली वाळू उक्ताड येथील शासकीय गोदामाच्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून दाभोळखाडीतील वाळू उत्खनन बंद आहे. तुर्तास वाळूचे गट देण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली असून त्यासाठी काही वाळू व्यावसायीक सरसावले आहेत. रॉयल्टी स्वरूपात काही रक्कम जमा देखील केली आहे. तसेच या व्यवसायासाठी उत्तर प्रदेशहून कामगार देखील मागविण्यात आले आहेत. त्यामुळे या आठवड्यात वाळू व्यवसाय जोमाने सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अशातच वाळूचा उत्खननाचा परवाना मिळण्याआधीच खाडीत उत्खनन केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. गोवळकोट येथे वाशिष्ठी नदीकिनाऱ्यांवर शासकीय जागेत हा वाळूसाठा आढळून आला.
याबाबतची माहिती मिळताच महसूल विभागाच्या भरारी पथकाने गुरूवारी रात्री गोवळकोट येथे अचानक धाड टाकली. यावेळी कालुस्ते पुलाजवळ वाळू साठा आढळला. साधारण ३५ ब्रास इतका हा वाळूसाठा असून त्याचे मोजमाप पहाटे ३ पर्यंत सुरू होते. त्यानंतर हा साठा उक्ताड येथील शासकीय गोदामाच्या ठिकाणी नेण्यात आला. मात्र ही वाळू कोणी आणली व त्यामागे कोण सुत्रधार आहे, हे अद्याप उघड झालेले नाही. त्यामुळे याप्रकरणी दंडात्मक कारवाई झालेली नाही. मात्र लवकरच या वाळूचा लिलाव महसूल विभागाकडून केला जाणार आहे. प्रांत अधिकारी प्रविण पवार, तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, मंडळ अधिकारी उमेश गिज्जेवार, तसेच गोवळकोट, मालदोली व कापसाळ येथील तलाठ्यांनी ही कारवाई केली.
Comments
Post a Comment