गोलमाल है भाई... सब गोलमाल है.
गोलमाल है भाई... सब गोलमाल है...!
जिल्हा रुग्णालयातील 13 ड्युरा सिलेंडर गायब
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात लाखो रुपये किमतीच्या ड्युरा सिलेंडरचा गोलमाल उघडकीस आला आहे. हे 13 सिलेंडर नेेमके गेले तरी कुठे याचा शोध लागणे गरजेचे असून याला जबाबदार असणार्या जिल्हा शल्य चिकित्सकांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.
जिल्हा रुग्णालय हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. या रुग्णालयाचा कारभार सर्वश्रूत आहे. मात्र असे असतानादेखील काम करणार्या अधिकार्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जातो, बिनकामाचे अधिकारी येथील लोकप्रतिनिधी प्रिय असल्याने याचाच फायदा घेत जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहारदेखील झाले आहेत. ज्यांनी कोरोना काळात ऑक्सिजनचा पुरवठा केला त्या पुरवठादाराची लाखो रुपयांची बिले जाणूनबुजून अडकवून ठेवली आहेत. हे बिल अडकवून ठेवण्याचे कारण काय? केवळ मलिदा मिळावा यासाठीच कोरोनामध्ये काम करणार्या अनेक आस्थापनांची बिले जिल्हा रुग्णालयाने मुद्दामहून अडकवून ठेवली आहेत.
आता तर 13 ड्युरा सिलेंडरचा गोलमाल पुढे आला आहे. हे ड्युरा सिलेंडर सध्या आहेत कुठे? एका सिलेंडरची किंमत अडीच ते तीन लाख रुपये इतकी आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे तेराही सिलेंडर जिल्हा रुग्णालयाच्या ताब्यात नाहीत. यामागचा गोलमाल काय? असा सवाल अनिकेत पटवर्धन यांनी उपस्थित केला आहे.
ज्यावेळी ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते त्यावेळी या ड्युरा सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र हे 13 सिलेंडर सध्या गायब असून स्वत:ची मान वाचवण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक सर्व जबाबदारी कर्मचार्यांवर ढकलू लागल्या आहेत. खरंतर याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.
यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा पर्दाफाश भाजपा युवा मोर्चाने केला. मात्र येथील लोकप्रतिनिधींनी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत अशा अधिकार्यांना अभय दिलं आहे. त्यामुळे असे अधिकारी अधिकच सोकावले आहेत. जिल्हा रुग्णालयाचा कारभार आणि या रुग्णालयात झालेला भ्रष्टाचार येत्या हिवाळी अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रासमोर येईल, असा इशाराच अनिकेत पटवर्धन यांनी दिला आहे.
कोरोना काळात जिल्हा रुग्णालयाला किती निधी आला. कोरोनासाठी मंजूर झालेला निधी नेमका कोणत्या कारणासाठी वापरला गेला यासह कोरोनाच्या नावाखाली जी काही खरेदी झाली आहे त्याचीदेखील चौकशी लावण्याची मागणी करणार असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले. जोपर्यंत जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारत नाही तोपर्यंत बेजबाबदारपणे वागणार्या अधिकार्यांना स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराच अनिकेत पटवर्धन यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment