लस न घेतलेल्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आली समोर!

मुंबई:
ओमिक्रॉन हा डेल्टापेक्षा कमी गंभीर असला तरी तो एक धोकादायक व्हायरस  आहे, असं डब्ल्यूएचओच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने रविवारी सांगितलं.

ज्यांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे, त्यांना असिम्प्टोटिक इन्फेक्शन, गंभीर आजार आणि मृत्यू होण्याचा धोका आहे. ज्यांना इतर आजार आहेत, ज्यांचं वय कमी आहे आणि ज्या लोकांचं लसीकरण झालेलं नाही, त्यांना ओमिक्रॉन झाल्यास ते गंभीर आजारी होऊ शकतात,असं WHOच्या कोविड-19 च्या टेक्निकल लीड मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी म्हटलं आहे.

लसीकरण हे गंभीर रोग, मृत्यू, काही इंफेक्शन आणि पुढील संक्रमणापासून बचाव करण्यासाठी विश्वसनीय उपाय आहेत, मात्र तो परिपूर्ण नाही. त्यामुळे लोकांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी चेहऱ्यावर मास्क परिधान करून, सुरक्षित शारीरिक अंतर राखणं, तोंड आणि हात धुणं, गर्दी टाळणं, घरून काम करणं, आवश्यकतेनुसार योग्य काळजी घेणं आणि चाचणी करून घेणं, या गोष्टी करणे आवश्यक आहे, असं त्या म्हणाल्या.

जगभरात ओमिक्रॉन आणि कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य प्रणालीवर मोठा ताण पडतोय. त्यातच आपण साथीच्या रोगाच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहोत. जर लोकांना आवश्यक असलेली योग्य काळजी घेता येत नसेल तर मोठ्या प्रमाणात लोकांना गंभीर आजार होतील आणि मृत्यू देखील मोठ्या प्रमाणात होतील, हेच आम्ही रोखू इच्छितो, असं मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या.

डब्ल्यूएचओ ओमिक्रॉनचं एक्सपोजर कमी करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी पार्टनर्ससोबत काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

शेवटी प्रत्येकालाच ओमिक्रॉनची लागण होईल का, असं विचारलं असता त्यांनी इतर तीन व्हेरिएंटच्या प्रसाराची तुलना केली. त्यानुसार ओमिक्रॉन प्रसाराच्या बाबतीत डेल्टाला मागे टाकत असून लोकांमध्ये वेगाने पसरत असल्याचं त्यांनी सांगितलं. पण याचा अर्थ त्याची लागण सर्वांनाच होईल असं नाही, असंही त्या म्हणाल्या.

ओमिक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नसेल, ज्याबद्दल आपण चर्चा करत असू. भविष्यात कोरोनाचे आणखी चिंतादायक व्हेरिएंट उद्भवण्याची शक्यता आहे, असा इशारा त्यांनी दिलाय.

Comments