पर्ससीन मासेमारीच्या नव्या कायद्या विरोधात साखरीनाटेतील मच्छीमारांच्या साखळी उपोषणाला आमदार डॉ.राजन साळवीनी दिली भेट
राजापूर/प्रतिनिधी दि.०४: महाराष्ट्र शासनाने केलेल्या पर्ससीन मासेमारीच्या नव्या कायद्या विरोधात विरोधात राजापूरातील साखरी नाटे येथील पर्ससीनधारक मच्छीमारांनी नाटेतील मत्सव्यवसाय परवाना अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सोमवारपासून सुरूवात केली असून सदर साखळी उपोषणाला आमदार डॉ.राजन साळवी यांनी भेट दिली.
महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय खात्याने ५ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नवीन पर्ससीन नियम लागू केले असून त्यात पर्ससीनधारक मच्छिमारांना १ जानेवारी ते ३१ मे पर्यंत पर्ससीन व्यवसायासाठी मनाई करण्यात आली आहे. तसेच १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत १२ वावाच्या बाहेर तसेच १ जानेवारीपासून ३१ मे पर्यंत व्यवसाय चालू ठेवायचा असेल तर महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्राबाहेर म्हणजे १२ नॉटिकल मैलाच्या बाहेर करावयाचा आहे.
या नव्या कायद्यामुळे हजारो पर्ससीनधारक व त्यावर अवलंबून असणारे लाखो खलाशी, व्यापारी आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायाला मुकले असल्याने मच्छीमार संघटनेतर्फे मागील कित्येक वर्षाच्या वहिवाटीनुसार पर्ससीनधारकांना माहे सप्टेंबर ते मे पर्यंत महाराष्ट्र जलधी क्षेत्रात मच्छिमारीस परवानगी होती, ती द्यावी, तसेच महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्राबाहेर मच्छिमारी करून येणाऱया पर्ससीन बोटींना बंदरात ये-जा करायला व मासळी उतरायला माहे सप्टेंबर ते मे पर्यंत परवानगी द्यावी. व पर्ससीन नौकांना नवीन मासेमारी देण्याबरोबर जुन्या मासेमारी परवान्यांचे नुतनीकरण करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
आमदार डॉ.राजन साळवी यांनी सदर मच्छीमारांच्या साखळी उपोषणाला भेट देऊन मच्छिमार नागरिकांच्या मागण्या समजून घेत खासदार विनायक राऊत व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून मत्स्यव्यवसाय खात्याने ५ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नवीन पर्ससीन नियम लागू केलेल्या जाचक अटींबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री ना.अस्लम शेख यांचा दालनामध्ये बैठक आयोजित करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
त्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दीपक नागले, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी प्रतीक महाडवाला, नाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, मच्छिमार नेते अमजद बोरकर, सरपंच नौशाद धालवेलकर, संतोष चव्हाण, शहादत हबीब, नदीम कोतवडेकर, आदिल म्हसकर, नदीम टमके, सिकंदर हातवडकर, साखरी नाटे शाखाप्रमुख मजिद गोवळकर व मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment