आता न ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांनाही निलंबित करा- अनिकेत पटवर्धन

.. आता न ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांनाही निलंबित करा- अनिकेत पटवर्धन

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मंत्री, खासदारांच्या सूचना अधिकारी ऐकत नाहीत, जिल्ह्यातील अधिकारीच लोकप्रतिनिधीना जुमानतच नाहीत अशी बातमी वाचनात आली. आमदार भास्करराव जाधव बेधडक आहेत. त्यांनी तालिका अध्यक्ष असताना भाजपाचे १२ आमदार निलंबित केले, त्याप्रमाणे जे अधिकारी ऐकत नाहीत त्यांना निलंबित करून दाखवावे. कारण निधी नसेल तर जिल्ह्याचा विकास खुंटणार आहे, त्यामुळे भास्कररावांनी हे पाऊल उचलावे, असे सूचक विधान करत भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केले आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्हा नियोजनच्या बैठकीत अधिकारी मंत्री, आमदार, खासदारांना विचारत नाहीत, परस्पर प्रस्ताव दिले जातात, असा आरोप आमदार, मंत्र्यांनी केला होता. त्या अनुषंगाने अनिकेत पटवर्धन यांनी पत्रकारांना सांगितले की, विविध हेडखालचे प्रस्ताव अधिकारी परस्पर विकत असल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला होता. भास्करराव धडाडीचे आमदार, माजी मंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. जर अधिकारी ऐकत नसतील त्यांनी त्यांचे निलंबन केले पाहिजे. कारण विधान सभेत भास्करराव तालिका अध्यक्ष असताना त्यांनी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केले होते. त्यावेळी त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. ते सत्तेत आहेत, जनतेची कामं करत आहेत आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी अधिकारी वर्ग कामात कुचराई करत असतील तर अशा अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे निलंबन करून दाखवावे. अधिकारी मोठे की सरकार मोठे, याचा विचार केला पाहिजे.

खासदार विनायक राऊत यांनी एक विधान केले होते, सिंधुदुर्गमध्ये मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे ९९ टक्के काम झाले आहे. पण या कामाच्या दर्जावर शंका निर्माण केली होती. त्याला उत्तर देताना अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले की, श्री. राऊत रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार आहेत. प्रत्येक विकासकामात केंद्राकडे बोट दाखवले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे नेते आहेत. उठसूठ भाजप व केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा दोन्ही जिल्ह्यातील समस्या, प्रत्येक खात्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकरिता विषय मांडला पाहिजे. जि. प. मध्ये अधिकारीपदे रिक्त आहेत. प्रत्येक कार्यालयात अधिकारी, कर्मचारी किती आहेत, याचा अभ्यास लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. उठसूठ भाजपावर बोलणे योग्य नाही. रत्नागिरी जिल्ह्यात सेना, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. जि. प. मध्ये सत्ता आहे. अशा स्थितीत रिक्त पदे, आणि असलेल्यांवर जादा भार का, यावर आमदार, खासदारांनी बोलावे.

जिल्ह्याच्या एकंदरित विकासकामे आणि समस्यांबाबतचा आढावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येणार आहेत. त्यांच्यासोबत केंद्रीय उद्योग मंत्री नारायणराव राणे हेसुद्धा येणार आहेत. राणे साहेबांच्या उद्योग मंत्रालयातून दोन्ही जिल्ह्यातील ५० हजार युवा, नवोदित, बेरोजगारांना संधी मिळणार आहे, अशी ग्वाही भाजपाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी दिली.

Comments