रत्नागिरी जिल्ह्यात आठवडा बाजारात मत्स्य विक्री करण्यासाठी निर्बंध शिथील करावेत: मिरकरवाडा महिला मच्छी व्यावसायिकांची सेवा सहकारी संस्थेची मागणी
मिरकरवाडा महिला मच्छी व्यावसायिकांची सेवा सहकारी संस्थेच्या मच्छी विक्रेत्या महिलांनी मत्स्य विक्रीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील आठवडा बाजारातील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी केली आहे. मिरकरवाडा महिला मच्छी व्यावसायिकांची सेवा सहकारी संस्थेच्या गरीब व गरजु महिला सन १९७२ पासून आठवडा बाजाराच्या ठिकाणी जाऊन मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात. उपरोक्त विषयान्वये कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्यामार्फत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. आपण आठवडा बाजार बंद केल्यामुळे आमच्या सारख्या हातावर पोट असलेल्या मच्छि विक्रेत्या महिलांवर उपासमारीची वेळ आली असून आमची रोजी रोटी पुर्णतः बंद झाली आहे. यापूर्वीही कोव्हीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मच्छि विक्रेत्या महिलांवर अतिशय बिकट आर्थिक परिस्थिती उद्भवली होती व त्याच्या नंतर पावसाळी हंगाम सुरु झाल्यामुळे मच्छि व्यवसाय बंदच राहिला. ह्या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये या सोसायटीचा व्यवसाय सुरु होऊन अवघे अडीच महिने झाले तोवर पुन्हा निर्बंध लागल्याने आठवडा बाजार बंद केल्यामुळे महिला हवालदिल झाल्या आहेत. काही आठवडा बाजार भागातील स्थानिक महिला मिरकरवाडा येथील येऊन मच्छि खरेदी करून आपल्या आठवडा बजार ठिकाणी विकतात त्याच्या पासून कोव्हिड फैलावत नाही का? आम्ही सर्व महिलांनी दोन्ही डोस घेतले आहोत. (आमचे आठवडा बाजार ठिकाण : रविवार बावनदी, आरवली, सावर्डा , देवरुख , करंजारी साखरपा मंगळवार वांद्री , कडवई , वहाल , लांजा बुधवार संगमेश्वर , नायरी , पाली , पाचल) कोरोना नियमांचे पालन मच्छी विक्रेत्या महिला मच्छी विक्री करू अशी आपणास ग्वाही देतो, तरी आमच्या या मागणीचा गांभिर्याने विचार करून आपण लवकरात लवकर आठवडा बाजारावर आणलेले निबंध शिथील करून आम्हा महिलांना आधार द्यावा ही नम्र विनंती. अशा आशयाचे पत्र दिनांक १७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच मत्स्य व्यवसाय आयुक्त यांच्याकडे सादर केले आहे.
Comments
Post a Comment